RTMNU Exams : गणिताचा पेपर फुटला; गोंदियाच्या महाविद्यालयातून नागपूरच्या विद्यार्थ्याच्या मोबाईलवर पेपर
नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा यंदा एमसीक्यू पद्धतीने घेण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना स्वतःच्या महाविद्यालयातूनच परीक्षा देण्याची सवलत असल्याने परीक्षेतील गैरप्रकार दररोज समोर येत आहे.
नागपूरः राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षेत मंगळवारी घेण्यात आलेले दोन पेपर रद्ध करण्यात आले असताना, गुरुवारी बीएससीच्या चौथ्या सत्रातील गणित -1 या विषयाचा पेपर व्हॉट्सअपवर व्हायरल झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. पेपर फुटल्याची माहिती परीक्षा विभागाला मिळताच, त्यांनी आज सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास घेण्यात आलेला गणिताचा पेपर रद्द केला आहे. पेपर गोंदिया येथील सखाराम देशमुख महिला महाविद्यालयातून फुटल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे परीक्षेदरम्यान महाविद्यालयांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
विद्यापीठाच्या परीक्षेदरम्यान मोठ्या प्रमाणात गैरप्रकार सुरू असल्याची बाब आता समोर येत आहे. बुधवारी सकाळी पाचपावली येथील सिंधू महाविद्यालयात बीएसस्सी अभ्यासक्रमांच्या पेपरमध्ये गैरप्रकार सुरू असल्याची माहिती समोर आली. यावर विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकांच्यावतीने धडक कारवाई करत दोन्ही पेपर रद्द करण्यात आले होते. याशिवाय सदर येथील अटलांटा महाविद्यालयाचे केंद्र रद्द केल्याची कारवाई केली.
दरम्यान गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास धरमपेठ महाविद्यालयात बीएसस्सीच्या सहाव्या सत्रातील गणित विषयाची परीक्षा सुरु होती. यावेळी एका विद्यार्थ्याला प्रा. रंगारी या प्राध्यापिकेने मोबाईलसह पकडण्यात आले. त्याचा मोबाईल तपासला असता, त्यामध्ये गणिताचा पेपर असल्याचे आढळून आले. त्यामुळे प्राध्यापिकेने याबाबत परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालकांना फोनवरून संपर्क करीत, त्यांना माहिती दिली. त्यानंतर पेपर कोणत्या केंद्रावरुन फुटला याची तपासणी केली. त्यातून तो गोंदिया येथील सखाराम देशमुख महिला महाविद्यालयातून फुटल्याची माहिती मिळाली. त्यामुळे परीक्षा विभागाने तत्काळ हा पेपर रद्द करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान मंगळवारीही सिंधू महाविद्यालयातील अंतिम सत्रातील फिजिक्स आणि झुलॉजी विषयाचे पेपर रद्द करण्याचा निर्णय संचालकांनी घेतला होता. याशिवाय गोविंदराव वंजारी अभियांत्रिकी महाविद्यालयातही अशाच प्रकारे पेपर फुटल्याने तिथेही पेपर रद्द करीत, तत्काळ दुसरी परीक्षा घेण्यात आली होती.
परीक्षा वभाग करणार कारवाई
गोंदिया येथील सखाराम देशमुख महिला महाविद्यालयातून फुटल्याची माहिती समोर आली. लिपिकाने हा पेपर डाऊनलोड केला. त्यानंतर तो कसा काय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला ? याची चौकशी करण्यात येऊन महाविद्यालयावर 48-8 कलमांतर्गत करावाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI