कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका स्थगित
कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आणि डेल्टा प्लसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पंचायत समित्यांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांची प्रक्रिया आहे त्या टप्प्यावर स्थगित करण्यात आली आहे.

मुंबई : धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम व नागपूर या पाच जिल्हा परिषदा तसेच त्यांतर्गतच्या 33 पंचायत समित्यांमधील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुका जुलैला घेण्यात येणार होत्या. परंतु कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आणि डेल्टा प्लसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पंचायत समित्यांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांची प्रक्रिया आहे त्या टप्प्यावर स्थगित करण्यात आली आहे. ही घोषणा निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.
मदान यांनी सांगितले की, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर या 5 जिल्हा परिषदांमधील 70 निवडणूक विभाग आणि 33 पंचायत समित्यांमधील 130 निर्वाचक गणांमधील पोटनिवडणुकांसाठी 19 जुलै 2021 ला मतदान होणार होते. परंतु 7 जुलैला राज्य शासनाने कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर या पोटनिवडणुका स्थगित करण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगाला केली होती.
सर्वोच्च न्यायालयाचे 6 जुलैचे आदेश आणि राज्य शासनाची विनंती लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने राज्य शासनाकडून कोविड-19 बाबत अधिकची माहिती आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागविले होते. त्या आधारे आयोगाने या निवडणुका आज आहे त्या टप्प्यावर स्थगित केल्या. त्यामुळे या पोटनिवडणुकांसाठी लागू असलेली आचारसंहितादेखील आजपासून शिथिल करण्यात आली आहे. कोविड-19 ची परिस्थिती सुधारल्यावर या पोटनिवडणुकांचे उर्वरित टप्पे पार पाडण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगातर्फे घोषणा करण्यात येईल, असे मदान यांनी सांगितले.
Before You Go
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
महत्त्वाच्या बातम्या





















