नांदेडमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचा वाद विकोपाला, तरुणाची दगडाने ठेचून हत्या
नांदेडमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधी गटात सामील झाला म्हणून तरुणाची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नांदेड : ग्रामपंचायत निवडणुकीतील वादाच्या पार्श्वभूमीवर 22 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे. नांदेडच्या देगलूर तालुक्यातील ही घटना आहे. शुक्रवार, 20 मार्च सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात दहा जणांविरूद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
योगेश विश्वनाथ धर्माची असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधी गटाचा प्रचार केल्याचा राग मनात धरून योगेशची हत्या करण्यात आली आहे. योगेशची रॉड व दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. सदरील तरुण ट्रॅक्टरने शेतातील कामे आटोपून गावाकडे परतत असताना, आरोपीने योगेशला ट्रॅक्टरच्या खाली उतरण्यास सांगितली. तू आमच्याविरुद्ध गेलास आणि आम्हाला मतदान केले नाहीस, असं म्हणत विटा व लोखंडी रॉडने त्याला डोक्यात जबर मारहाण करण्यात आली. यात योगेश जागीच ठार झाला. योगेश याचा खून निवडणुकीच्या वादातूनच झाल्याची माहिती योगेशच्या वडिलांनी दिली आहे.
या घटनेमुळे जिल्हाभरात खळबळ उडाली असून बल्लूर गावास छावणीचे रूप आलं आहे. गावातील वातावरण बिघडू नये यासाठी देगलूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांनी घटनास्थळी धाव घेऊन सदरील घटनेचा पंचनामा करून आरोपींना ताब्यात घेतलं आहे. आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदण्यावण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.