(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दुर्देवी! भंडारा जिल्ह्यात पाच वर्षीय वाघाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
छोट्या जंगली प्राण्यांची शिकार करण्यासाठी लावलेल्या विद्युत प्रवाहात अडल्याने रुद्र या वाघाचा दुर्देवी अंत झाला आहे.
भंडारा : भारताचा राष्ट्रीय प्राणी असणाऱ्या वाघाच्या संरक्षणासाठी त्यांची संख्या वाढवण्यासाठी विविध उपक्रम देशभरात राबवले जातात. पण अशातच महाराष्ट्राच्या भंडारा जिल्ह्यात एका तरुण, रुबाबदार वाघाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. छोट्या जंगली प्राण्यांची शिकार करण्यासाठी लावलेल्या विद्युत प्रवाहात हा वाघ अडकला आणि त्याला विजेचा धक्का लागून जागीच त्याचा मृत्यू झाला. भंडारा शहरापासून अवघ्या 6 किलोमीटर अंतरावर पलाडी गावाच्या शेतशिवारात शुक्रवारी दुपारचा सुमारास हा मृतदेह गावकऱ्यांना दिसला.
मृत वाघ हा रावणवाडी, धारगाव या जंगलात फिरणारा B2 उर्फ रुद्र नावाने ओळखला जाणारा तरुण वाघ होता. जवळापास 5 वर्ष इतकं वय असलेला रुद्र अंदाजे 200 किलोचा एक रुबाबदार वाघ होता. मृत अवस्थेत असूनही त्याला पाहणाऱ्यांना पाहताक्षणी धडकी भरेल अशी त्याची शरीरयष्टी होती. रुद्रवर लक्ष ठेवणाऱ्या सामाजिक संस्थेने दिलेल्या माहितीनुसार तो आज (शुक्रवारी) पहिल्यांदाच या क्षेत्रात आला होता. ज्या ठिकाणी रुद्र याचा मृतदेह आढळून आला त्याठिकाणी तब्बल 1100 वॅटचा विद्युत प्रवाह जात आहे. शेजारीच एक नाला तसंच शेतकऱ्यांची शेतं देखील आहेत. या परिसरातील शेतकरी दररोज त्यांच्या शेतावर येतात. मात्र रुद्र कधीच त्यांना दर्शन झालं नव्हतं. पण आज प्रथमच रुद्र या क्षेत्रात आला आणि त्याला त्याचा जीव गमवावा लागला.
वनक्षेत्राचं मोठं नुकसान
ज्या शेतकऱ्याच्या शेतात हा मृतदेह आढळला त्याने भंडारा वनविभागाला त्याची सूचना दिली. घटनास्थळी वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच पोलीस विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी पोहोचले. घटनेची माहिती परिसरात पसरल्याने नागरिकांनी वाघ पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती या परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल नसले तरी रानडुक्कर आणि इतर छोटे प्राणी यांची शिकार करण्यासाठी शिकारी अशाप्रकारच्या विद्युत तारा लावून ठेवतात. अशाच तारांना स्पर्श होऊन या वाघाचा मृत्यू झाला असल्याचा खात्रीदायक खुलासा भंडारा मानद वन्य जीव रक्षक यांनी केला आहे. हा वाघ या परिसरातील शान होता पण त्याच्या अशा अकाली मृत्यूमुळे भंडारा जिल्ह्याचा आणि वन क्षेत्राचं मोठं नुकसान झालं आहे.