Yes Bank Scam : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय छाब्रिया यांना अटक, सीबीआयची कारवाई
येस बँक घोटाळा प्रकरणी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि रेडियस ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक संजय छाब्रिया यांना सीबीआयने अटक केली आहे.
मुंबई: प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि रेडियस ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक संजय छाब्रिया यांना येस बँक घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने अटक केली आहे. येस बँकेच्या 3 हजार 700 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी सीबीआय आणि ईडीकडून तपास केला जात आहे.
डीएचएफएल या फायनान्स कंपनीने येस बँकेकडून 3000 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. ही कंपनी नंतर दिवाळखोरीत दाखवून हे कर्ज बुडवण्यात आलं होतं. या कर्जाचा मोठी हिस्सा हा रेडियस ग्रुपला देण्यात आला होता. येस बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी हे कनेक्शन उघड झालं असून सीबीआयने ही कारवाई केली आहे.
काही महिन्यांपूर्वी संजय छाब्रिया यांच्या रेडियस या ग्रुपवर सीबीआयने छापेमारील केली होती. तेव्हापासूनच त्यांना अटक होणार अशी चर्चा होती. संजय छाब्रिया यांनी बीकेसीमधील एक बिल्डिंग बांधली होती. त्यामध्ये अनेक राजकारण्याचं कनेक्शन असल्याचा सीबीआयला संशय आला आहे. त्यामुळे सीबीआयच्या या कारवाईमुळे आता अनेक राजकारण्यांचे धाबे दणाणले आहेत.
आर्थिक अनियमितता आणि बेहिशेबी कर्जवाटप यामुळे रिझर्व्ह बँकेनं येस बँकेवर गेल्या वर्षी 5 मार्चपासून निर्बंध लागू केले होते. मात्र त्यानंतर टप्याटप्याने ते शिथिल केले आणि येस बँकेचे व्यवहार पूर्ववत केलेत. हा घोटाळा उघड झाल्यानंतर येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना अटक करण्यात आली होती. त्यांनंतर त्यांची पत्नी बिंदूसह दोन मुली रोशनी आणि राधा यांनाही अटक करण्यात आली होती.
राणा कपूर बँकेचा सीईओ असताना सुमारे 30 हजार कोटी रुपयांचं कर्जवाटप झालं होतं. यापैकी 20 हजार कोटी रुपयांची कर्ज बोगस असल्याचा दावा तपासयंत्रणेने केला आहे. त्याचबरोबर त्यानं सुमारे 202.10 कोटी रुपयांची कर्ज काही दिवाळखोरी जाहीर केलेल्या कंपन्यांसाठी मंजूर केल्याचेही उघड झाले आहे.