यवतमाळ पंचायत समिती निवडणुकीत राडा, शिवसेना-भाजप नेत्यांमध्ये जुंपली
शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांनी बंडखोरी केल्याने भाजपचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्याम जयस्वाल गट आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड या नेत्यांमध्ये धक्काबुक्की झाली.

यवतमाळ : यवतमाळ पंचायत समिती सभापती, उपसभापती पदासाठीच्या निवडणुकीत भाजप-शिवसेनेच्या नेत्यांमध्ये राडा पाहायला मिळाला. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांनी बंडखोरी केल्यामुळे निवडणुकीदरम्यान मोठा गदारोळ पाहायला मिळाला. त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
यवतमाळमध्ये महाविकास आघाडी आणि भाजप असा सामना पाहायला मिळत आहे. मात्र राष्ट्रवादीचे सदस्य नरेश ठाकूर हे भाजपवासी झाले. तर शिवसेनेच्या नंदाबाई लडके या देखील भाजपच्या गोटात सामील झाल्या. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना गोंधळ घाल्यायला सुरुवात केल्याने काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
भाजपचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्याम जयस्वाल गट आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड या नेत्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याचं पाहायला मिळालं. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना शांत केलं. या धक्काबुकीत शिवसेनेच्या बंडखोर सदस्यया नंदा लडके यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पंचायत समिती परिसरात तणावाची परिस्थिती लक्षात घेत पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.























