(Source: Poll of Polls)
सरस्वतीची प्रतिमा ठेवली म्हणून साहित्यीक यशवंत मनोहरांनी विदर्भ साहित्य संघाचा नाकारला पुरस्कार
कार्यक्रमात सरस्वतीची प्रतिमा ठेवली म्हणून साहित्यीक यशवंत मनोहर ह्यांनी विदर्भ साहित्य संघाचा जीवन व्रती पुरस्कार नाकारला आहे
नागपूर : पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात सरस्वतीची प्रतिमा ठेवली म्हणून साहित्यीक यशवंत मनोहर यांनी विदर्भ साहित्य संघाचा जीवन व्रती पुरस्कार नाकारला आहे. विदर्भ साहित्य संघातर्फे डॉ. मनोहर यांना जीवनव्रती पुरस्काराने गौरविण्यात येणार होते. मात्र कार्यक्रमात सरस्वीतीची प्रतिमा ठेवू नये अशी मागणी साहित्यीक मनोहर यांनी केली होती. मागणी केल्यानंतरदेखील परंपरेप्रमाणे सरस्वतीची प्रतिमा ठेवण्यात आली, यामुळे नाराज मनोहर यांनी कार्यक्रमस्थळी पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला.
"डॉ.ओरकेंनी मी सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे चौकशी केली, पण तुम्ही कार्यक्रमात सरस्वतीची प्रतिमा ठेवणारच असं कळलं. मराठी साहित्यातील माझी प्रखर इहबुद्धिवादी प्रतिमा लक्षात घेऊन आपण अशा दुरुस्त्या कराल असं वाटलं होतं, पण ते झालं नाही म्हणून मी नम्रपणे हा पुरस्कार नाकारण्याचा निर्णय घेतलेला आहे", असे पत्र डॉ. मनोहर यांनी साहित्य संघाला पाठवले आहे.
"स्त्रिया आणि शूद्रातिशूद्रांना शिक्षणबंदी आणि ज्ञानबंदी करणा-या शोषणसत्ताकाची प्रतीकं मी पूर्णतःनाकारलीच आहेत. माझा सन्मान म्हणजे जिच्या अनन्यतेमुळे मी ओळखला जातो त्या माझ्या जीवनदृष्टीचा सन्मान! माझ्या या जीवनदृष्टीत न बसणारे अनेक पुरस्कार मी नाकारले आहेत. हा वाङ्मयीन कार्यक्रम आहे आणि त्यात धर्म येणं मला अजिबात मान्य नाही", असेही त्यांनी म्हटलं आहे.
मात्र साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांनी सरस्वतीचा फोटो हा साहित्य संघाची प्रथा-परंपरेचा भाग असून हॉलचे नावचं रंगशारदा असल्याचे सांगितले. या वेळी महाराष्ट्रातील इतर अनेक लेखकांना त्यांच्या साहित्यासाठी पुरस्कृत करण्यात आले.