एक्स्प्लोर
प्रसववेदना सहन करत गर्भवतीची तीन किमी पायपीट, रस्त्यावरच प्रसुती
आजही रस्ता, आरोग्य, शिक्षण अशा सुविधा पोहोचण्याची प्रतीक्षा लोकांना करावी लागत आहे. एकविसाव्या शतकात विकासाची स्वप्न बघताना अशा घटना खरंच विचार करायला लावतात.
वर्धा : एकीकडे विकासाचे ढोल बडवले जातात, लोकप्रतिनिधी कार्यसम्राटाच्या बिरुदावली लावून मिरवतात. पण गावखेड्यांत अजून रस्त्यासारख्या पायाभूत सुविधा न पोहोचल्याने लोकांना जीवनमरणाचा संघर्ष करावा लागतो. गावात जाण्यासाठी धड रस्ताही नसल्याने नऊ महिन्यांच्या गर्भवती मातेला मध्यरात्री अंधारलेल्या खडतर रस्त्याने तीन किलोमीटर पायपीट करावी लागली. दुसऱ्या गावात पोहोचल्यावर महिलेची रस्त्यातच प्रसुती झाली.
सकिना किरण पवार असं या महिलेचं नाव आहे. सध्या सकिना आणि त्यांचं बाळ वडनेरच्या ग्रामीण रुग्णालयात आहेत. हिंगणघाट तालुक्यात सेलू या गावापासून तीन किलोमीटर अंतरावर पारधी बेडा आहे. गावात जायला योग्य रस्ता नसल्याने वाहन नेणं शक्य होत नाही. सकिना यांना मध्यरात्री प्रसववेदना सुरु झाल्या. रात्रीच कुटुंबातील तीन जणांना सोबत घेऊन पायदळी प्रवास सुरु केला. सेलू इथे पोहोचल्यानंतर रुग्णवाहिकेची वाट पाहत रस्त्यावरच त्यांची प्रसुती झाली. आरोग्यसेविकेन रुग्णवाहिका बोलावली. पण ही रुग्णवाहिका पाच तास उशिराच पोहोचली.
15 ते 20 घरांचा हा बेडा विकासाच्या दृष्टीन दुर्लक्षितच. गावात जायला रस्ता नाहीच. झुडपी जंगल, चाकोली, नाल्यातूनच ये-जा करावी लागते. गावातली मुलं, मुली शाळेत जातीलच याची खात्री नाही. रस्त्याला लागूनच जंगल, शेती असल्याने रात्री वन्यप्राणी कधीही येतात. अशा अडचणीतून गावकरी वाटचाल करतात. नावालाही रस्ता वाटणार नाही, अशी वाट तुडवत गर्भवती महिला तीन किलोमीटर पायदळ चालत आली. सकिनाला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. वडनेरच्या ग्रामीण रुग्णालयात भरती करताच आई आणि बाळावर उपचार करण्यात आले.
रस्त्याचं काम भूमीपूजनाच्या पुढे सरकलेलं नाही. आजही रस्ता, आरोग्य, शिक्षण अशा सुविधा पोहोचण्याची प्रतीक्षा लोकांना करावी लागत आहे. एकविसाव्या शतकात विकासाची स्वप्न बघताना अशा घटना खरंच विचार करायला लावतात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement