विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त जागेसाठी रणजितसिंह डिसलेंची शिफारस करणार : प्रवीण दरेकर
विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त जागेसाठी रणजितसिंह डिसलेंची शिफारस करणार असल्याचं विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.रणजित डिसले गुरूजींचा अभिनंदन प्रस्ताव विधिमंडळात मांडणार असल्याचंही ते म्हणाले. दरेकर यांनी डिसले यांचा बार्शीत येऊन सन्मान केला.
सोलापूर : 'ग्लोबल टीचर प्राईज' प्राप्त केलेल्या बार्शीतील रणजितसिंह डिसले यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी बार्शीत येऊन डिसले यांचा आज सन्मान केला. इतर शिक्षकांनी त्यांचा आदर्श घ्यावा अशा पद्धतीची कामगिरी डिसले सरांची आहे. रणजित डिसले यांची विधानपरिषदेच्या 12 जागांपैकी एक जागेसाठी शिफारस करू, असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.
यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील फोनद्वारे डिसले गुरुजींचे अभिनंदन केले. राज्याच्या विधीमंडळामध्ये डिसले सरांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडणार असल्याची माहिती देखील प्रवीण दरेकर यांनी दिली. दरेकर म्हणाले की, राज्यात नुकत्याच विधानपरिषदेच्या शिक्षक मतदारसंघाच्या जागांसाठी निवडणूक झाल्या. यामध्ये शिक्षक नसलेला व्यक्ती शिक्षक आमदार होतो हेच देशाचे दुर्दैव आहे, अशी टीका त्यांनी केली. रणजित डिसले यांची विधानपरिषदेच्या 12 जागांपैकी एक जागेसाठी शिफारस करू. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्याशी बोलून शिफारशीचे पत्र देऊ असे आश्वासन विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी यावेळी दिले.
युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा 'ग्लोबल टीचर प्राईज' पुरस्कार सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना मिळाला आहे. 7 कोटी रुपयांचा हा पुरस्कार डिसले यांना जाहीर झाला आहे. लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी याची अधिकृत घोषणा केली. असा पुरस्कार मिळणारे रणजितसिंह पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत. जगभरातील 140 देशांतील 12 हजारहून अधिक शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डिसले गुरुजींची घोषणा करण्यात आली आहे. QR कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्रचं नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रात अभिनव क्रांती केलेल्या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्काराच्या एकूण रक्कमेपैकी 50 टक्के रक्कम अंतिम फेरीतील 9 शिक्षकांना देण्याचे रणजीतसिंह डिसले यांनी जाहीर केले असून, यामुळे 9 देशांतील हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाईल. डिसले गुरुजींना मिळालेली रक्कम ते टीचर इनोव्हेशन फंडकरता वापरणार असून त्यामुळे शिक्षकांमधील नवनवीन प्रयोग करण्यास चालना मिळेल.
'ग्लोबल टीचर प्राईज' विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले यांचं दलाई लामा यांच्याकडून कौतुक!
रणजीत डिसले यांचं कार्य?
लेट्स क्रॉस द बॉर्डर या अभिनव शैक्षणिक प्रयोगाच्या माध्यमातून भारत, पाकिस्तान, इराक, इराण, इस्रायल, पॅलेस्टाईन, अमेरिका आणि उत्तर कोरिया या जगातील सर्वात अशांत देशांतील 50000 मुलांची पीस आर्मी तयार करुन परस्पर सौहार्दाचे वातावरण करण्याच्या या शैक्षणिक प्रयोगाकरिता त्यांची निवड करण्यात आली आहे. तंत्रस्नेही शिक्षणाच्या माध्यमातून शांतता निर्माण करण्याचा हा प्रयत्न इतर देशांतील शिक्षकांना प्रेरणादायी आहे, अशा शब्दात निवड समितीने त्यांचा गौरव केला आहे. रणजीतसिंह डिसले सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडीच्या शाळेत मागील 11 वर्षांपासून कार्यरत आहेत.
रणजीत डिसले गुरुजी हे तंत्रज्ञानातील अभिनव प्रयोगांमुळे जगभर ओळखले जातात. जगभरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना ते ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन करत असतात. डिसले गुरुजींनी तयार केलेली QR कोडेड पुस्तके आज 11 देशांतील 10 कोटींहून अधिक मुले वापरत आहेत. व्हर्च्युअल फिल्ड ट्रिप या आगळ्यावेगळ्या अध्यापन पद्धतीच्या माध्यमातून ते 150 हून अधिक देशांतील शाळांमध्ये विज्ञान विषयाचे अध्यापन करतात. अशा पद्धतीने अध्यापन करणारे ते जगातील सातवे शिक्षक ठरले आहेत. याआधी मायक्रोसॉफ्ट, नॅशनल जिओग्राफिक सोसायटी या आंतरराष्ट्रीय संस्थांनी रणजितसिंह डिसले यांच्या कार्याचा गौरव केला आहे.