Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादीत फूट पाडणं भाजपला पडणार महागात? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात...
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली, त्याचे दुवे 2024 च्या लोकसभा निवडणुकीशी जोडले जात आहेत. अजित पवारांना पक्षातून तोडून भाजप 2024 लोकसभेचा मार्ग मोकळा करत आहे का?असा प्रश्न निर्माण होत आहे.
NCP Political Crisis: अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक गट महाराष्ट्रातील सत्ताधारी शिंदे-भाजप आघाडीत सामील झाला आहे. राष्ट्रवादी फुटीनंतर विरोधकांनी भाजपवर आरोप केले आहेत. 2024 च्या निवडणुकांपूर्वी स्वतःच्या फायद्यासाठी भाजपने पक्षात फूट पाडल्याचंही बोललं जात आहे.
भाजपसोबत गेलेले बहुतांश जण ईडीच्या फेऱ्यात
रविवारी (2 जुलै) अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे, यातील काहीजण हे मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीच्या चौकशी फेऱ्यात आहेत. आपल्या संपत्तीवरील ईडीची टाच दूर करण्यासाठी काही आमदारांनी भाजपसोबत हात मिळवल्याचं बोललं जात आहे. मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या नऊपैकी किमान तीन आमदारांच्या मानेवर ईडीची टांगती तलवार असल्याचं सांगितलं जातं. अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्याशिवाय छगन भुजबळ आणि रायगड-रत्नागिरीचे खासदार सुनील तटकरे यांचाही मंत्रिमंडळात समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे देखील ईडीच्या तपासाच्या फेऱ्यात असल्याचं सांगण्यात येत आहे. भाजपला पाठिंबा दिल्यामुळे ईडी या राष्ट्रवादीच्या नेत्यांवरील खटले मागे घेणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सुप्रिया सुळेंविरोधात भाजप अजित पवारांचा मुलगा पार्थला देऊ शकते उमेदवारी
बारामती लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे करत आहेत. सुळेंकडून बारामतीची जागा हिसकावण्यासाठी भाजपने आधीच तयारी केली आहे. एका ज्येष्ठ भाजप नेत्याच्या म्हणण्यानुसार, अजित पवार यांचा मोठा मुलगा पार्थ पवार याला सुप्रिया सुळेंविरोधात उभं केलं जाऊ शकतं. तर दुसरीकडे, राष्ट्रवादीच्या नेत्यांशी वर्षानुवर्षे भांडणाऱ्या भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचाही या युतीमुळे भ्रमनिरास होऊ शकतो.
भाजप नेते आणि अजित पवारांच्या गटात पूर्वीपासूनच मतभेद
अजित यांच्यासह मंत्रिपदाची शपथ घेणारे राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांना कोल्हापुरातील कागल मतदारसंघात भाजपकडून कडवं आव्हान आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांच्यातील वाद 2019 च्या विधानसभा निवडणुकीपासून तीव्र झाला आहे. समरजित घाटगे हे भाजपचे आहेत. कागलच्या माजी राजघराण्याचे वंशज विक्रमजितसिंह घाडगे यांचे ते सुपुत्र आहे.
मनी लाँड्रिंग प्रकरणात मुश्रीफ ईडीच्या चौकशीला सामोरे जात होते. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर या वर्षी फेब्रुवारीमध्ये 40 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुश्रीफ यांचे राजकीय प्रतिस्पर्धी समरजित घाटगे यांच्या सांगण्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप समर्थकांनी केला आहे.
भाजपसमोर भांडणं सोडवण्याचं आव्हान
शरद पवार यांच्या जवळच्या व्यक्तीने सांगितलं की, भाजपमध्ये असे अनेक नेते आहेत ज्यांचे राष्ट्रवादीच्या नेत्यांशी मतभेद आहेत. हे परस्पर मतभेद दूर करण्यासाठी भाजप रणनीती आखेल, पण आपापसांतील मतभेद दूर होतील याची काही शाश्वती नाही. सध्या मुश्रीफांसारख्या राष्ट्रवादी नेत्यांना त्यांच्या मतदारसंघातील भाजपकडून तीव्र विरोध होत आहे. आता हे राजकारण पुढे कसं चालतं? हे पाहणं रंजक ठरेल.
अजित पवारांच्या भाजप नेत्यांशी असलेल्या संबंधांवर प्रश्न
राज्यसभा खासदार आणि साताऱ्याच्या राजघराण्याचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याशीही अजित पवारांचे चांगले संबंध नाहीत. 1998 मध्ये भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी उदयनराजे भोसले यांना भाजपमध्ये आणलं होतं.
पुढील वर्षी होणारी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने सर्वोतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत. ही आघाडी करून भाजपला असे नेते तयार करायचे आहेत जे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांना आव्हान देऊ शकतील.
राष्ट्रवादी आणि भाजपात अंतर्गत कलहाची शक्यता
ज्येष्ठ पत्रकार ओम सैनी यांनी एबीपी न्यूजला फोनवरून सांगितलं की, शरद पवार जेव्हा पराभव स्वीकारतील तेव्हाच भाजपचा 2024 चा प्रयोग यशस्वी होईल. जे शक्य नाही. जे शरद पवारांमध्ये आहे ते अजित पवारांमध्ये नाही. नुकतंच शरद पवारांनी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचं स्पष्ट केलं, त्यावेळी मराठी माणसांमध्ये खळबळ उडाली होती. अजित पवारांचा तसा दबदबा नसल्याचं ते म्हणाले.
दुसरीकडे, राष्ट्रवादी आणि भाजपच्या विविध नेत्यांचं एकमेकांशी जुळत नसल्यानं मोठा पेच निर्माण होऊ शकतो. एका पक्षाच राहणं नेत्यांनी कठीण होऊ शकतं, असं सैनी यांचं मत आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत परिस्थिती कशी असेल याबाबत आतापासूनच काही सांगता येणार नाही. पण, दोन्ही पक्षात अंतर्गत वाद नक्कीच वाढू शकतात. पण भाजप हा चालाख पक्ष असून निवडणुकीच्या तोंडावर कोणतंही पाऊल उचलू शकतो, हेही लक्षात ठेवायला हवं.
भाजपने 2019 च्या घटनेचा बदला घेतला?
आणखी एक ज्येष्ठ पत्रकार आर. राजगोपालन यांनी सांगितलं की, भाजपने 2019 मधला बदला एका झटक्यात पूर्ण केला आहे. जेव्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेला एनडीएपासून वेगळं केलं आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं होतं, त्यावेळी भाजपला मोठा धक्का बसला होता. भाजपने आता महाराष्ट्रात 2024 च्या लोकसभा निवडणुकीचा मार्ग मोकळा करायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादीसारख्या मोठ्या पक्षामुळे भाजपची कोंडी होत होती, म्हणून भाजपने त्यांच्या रस्त्यातला काटा आपल्या बाजूला वळवला.
हेही वाचा: