बॉलिवूड व ड्रग माफीयांची माहिती न देताच ‘ड्रामा क्वीन’ का परत गेली? : सचिन सावंत
मुंबईत काही दिवस राहून कंगनाने तिच्याकडील ड्रग माफियांची माहिती का दिली नाही. या सर्व प्रकरणातून कंगणा ही भाजपाची कठपुतली असून महाराष्ट्राला बदनाम करण्याच्या कटाचा ती भाग आहे, हे आता स्पष्ट झाले, असेही सावंत म्हणाले.
मुंबई : मुंबई व महाराष्ट्राला वाट्टेल ते बोलणारी ड्रामेबाज नटी मुंबईत येण्याआधी फारच फुशारक्या मारत होती. बॉलिवूडच्या ड्रग कनेक्शन संदर्भात आपल्याकडे माहिती आहे असेही ती तावातावाने सांगत होती. महाराष्ट्र सरकारला आव्हान देण्याची भाषा करत मुंबईत येऊन या नटीने तमाशाही केला परंतु ड्रग संदर्भातील कोणतीही माहिती सरकारी यंत्रणांना न देताच परत का गेली, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.
कंगनाचा समाचार घेताना सावंत म्हणाले की, बॉलिवूडचे ड्रग माफीया कनेक्शन व त्यासंदर्भातील गुन्ह्यांची माहिती तिच्याकडे आहे असे कंगनाने जाहीरपणे सांगितले होते. अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात ड्रग कनेक्शन उघड होताच एनसीबी याप्रकरणी चौकशी करत होती, त्यांच्याकडे कंगनाने ड्रग संदर्भातील माहिती देणे उचित होते परंतु या नटीने कसलाही संदर्भ नसताना मुंबई पोलिसांची यथेच्छ बदनामी केली. मुंबई पोलीस याचा त्यावेळी तपास करत नव्हते. कंगनाकडे बॉलिवूड व ड्रग कनेक्शनची जी माहिती आहे ती तीने एनसीबीकडे द्यावी अशी आम्ही मागणीही केली होती. पण मुंबईत काही दिवस राहून कंगनाने ही माहिती दिली नाही हे आश्चर्यकारक आहे.
एखाद्या गुन्ह्याची माहिती दडवणे हे आयपीसीच्या कलम 176 व 220 व एनडीपीएस अॅक्टनुसार गुन्हा ठरते व नागरिक कर्तव्याचे ते हनन ठरते याची कंगनाला माहिती असावी आणि तरीही ती माहिती न देता हिमाचल प्रदेशकडे परत गेली. यातून कंगना फक्त नौटंकी करण्यात माहिर असून तेवढ्यासाठी मुंबईत येऊन तमाशा करुन परत गेली असे म्हणण्यास वाव आहे, असे सावंत म्हणाले.
कंगनाकडे ड्रग कनेक्शन संदर्भात असलेली माहिती ती देण्यास तयार आहे आणि ही माहिती दिली तर अनेकांचे पितळ उघडे पडेल, तसे होऊ नये या भीतीपोटीच कंगनाला वेगवेगळ्या माध्यमातून त्रास दिला जात असल्याचे महाराष्ट्रातील भाजप नेते म्हणत होते. महाराष्ट्र, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्याबद्दल एकेरी भाषा तर तीने वापरलीच पण मुंबई पोलिसांना माफीया म्हण्यापर्यंतही मजल गेली. तिच्याकडे जर काही माहिती आहे तर मुंबईत काही दिवस राहून कंगनाने तिच्याकडील ड्रग माफियांची माहिती का दिली नाही. या सर्व प्रकरणातून कंगणा ही भाजपाची कठपुतली असून महाराष्ट्राला बदनाम करण्याच्या कटाचा ती भाग आहे, हे आता स्पष्ट झाले, असेही सावंत म्हणाले.
संबंधित बातम्या :