सुशांतचे मारेकरी, मुव्ही माफिया, ड्रग तस्कर हे तर आदित्यचे साथीदार, कंगनाचे ट्विटद्वारे गंभीर आरोप
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आता कंगनाने थेट आव्हान दिलं आहे. विशेष म्हणजे या ट्विटमध्ये तिने पहिल्यांदाच ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलं आहे.
मुंबई : कंगना अखेर चार दिवसांच्या आपल्या मुंबई दौऱ्यानंतर पुन्हा हिमाचल प्रदेशमध्ये परतली आहे. पण तिकडे गेल्यानंतर आता ती आणखी भडक विधानं करू लागली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आता कंगनाने थेट आव्हान दिलं आहे. विशेष म्हणजे या ट्विटमध्ये तिने पहिल्यांदाच ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलं आहे.
कगंनाने सोमवारी 5 च्या सुमारास केलेल्या ट्विटमध्ये उद्धव ठाकरे सूडबुद्धीने माझ्यावर कारवाई करत असल्याचं म्हटलं आहे. ती म्हणते, 'महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची मूळ समस्या अशी की मी मुव्ही माफिया, सुशांतसिंह राजपूतचे मारेकरी आणि त्यांच्या अंमली पदार्थाच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. ही सगळी मंडळी ठाकरे यांचे लाडके चिरंजीव आदित्य यांच्यासोबत असतात. हा माझा मोठा अपराध आहे. म्हणूनच माझा बंदोबस्त करण्यामागे ते आहेत. पण ठिके. आता बघू कोण कुणाचा बंदोबस्त करतो.'
Basic problem of Maharashtra CM is why I exposed movie mafia, murderers of SSR and its drug racket, who his beloved son Aaditya Thakeray hangs out with, this is my big crime so now they want to fix me, ok try let’s see who fixes who!!! https://t.co/KzfVPfx5s8
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 14, 2020
कंगनाच्या या ट्विटमुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात धरणीकंप येण्याची शक्यता आहे. आजवर केलेल्या ट्विटपैकी पहिल्यांदाच कंगनाने उद्धव ठाकरे यांना खुलं आव्हान देत आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत. सुशांतच्या हत्येत सहभागी असणारे, अमली पदार्थाच्या तस्करीत असणारे आदित्य यांचे साथीदार असल्याचे दोन गंभीर आरोप कंगनाने केले आहेत. यावर अद्याप आदित्य वा ठाकरे यांच्याकडन काही प्रतिक्रिया मिळालेली नाही.
कंगनाने रविवारी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली होती. महाराष्ट्रात आल्यानंतर तिने मुंबईबद्दल गरळ ओकणं चालू ठेवलं होतंच. पण आता हिमाचल प्रदेशमध्ये आपल्या घरी पोचल्यानंतर तिच्या वक्तव्यांना धार चढली आहे. सुशांतसिंहची हत्याच झाली असून मुव्ही माफिया, अमली पदार्थाच्या तस्करीत असलेले यांनी मिळून त्याची हत्या केल्याचं कंगनाने सांगितलं होतं. आता तिने थेट आदित्यचे नाव घेतल्याने हे प्रकरण आता गंभीर बनलं आहे.