Weather Update : आजही अवकाळी पावसाची शक्यता कायम, वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव; पुढील काही दिवसात तापमान वाढणार
IMD Weather Forecast : आयएमडीच्या अंदाजानुसार, नव्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचाही परिणाम पश्चिम हिमालयीन प्रदेशावर होण्याची शक्यता आहे. येत्या 24 तासांत उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Weather Update Today, 9 March : राज्यासह देशाच्या हवामानावर वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव कायम आहे. त्यामुळे देशात काही भागात आजही पावसाची हजेरी (Unseasonal Rain) पाहायला मिळणार आहे. भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अपडेटनुसार, डोंगराळ भागात आज मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टीची दाट शक्यता आहे. एकीकड काही भागात जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे काही ठिकाणी तापमानात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन-तीन दिवस हवामानात जास्त बदल होण्याची शक्यता नाही. मात्र, त्यानंतर तापमानात हळूहळू वाढ होईल.
दक्षिण भारतात उष्ण आणि दमट हवामान
भारतीय हवामान खात्याने (IMD) जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये 10 मार्चपर्यंत पाऊस आणि हिमवृष्टीसाठी अलर्ट जारी केला आहे. पुढील चार दिवस देशाच्या बहुतांश भागात कोरडे हवामान राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आयएमडीने म्हटलं आहे की, तामिळनाडू आणि केरळमध्ये दोन दिवस उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे.
'या' भागात पावसाची शक्यता
गेल्या काही दिवसात देशातील हवामानात मोठा बदल झाल्याचं दिसत आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, नव्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचाही परिणाम पश्चिम हिमालयीन प्रदेशावर होण्याची शक्यता आहे. येत्या 24 तासांत उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडू शकतो, तर राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये ढगाळ वातावरण राहील.
महाराष्ट्रात हवामान कसं असेल?
येत्या 24 तासांत राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता कायम आहे. गेल्या काही दिवसात राज्याला अवकाळी पावसानं झोडपलं आहे. काही जिल्ह्यांमध्ये पावसामुळे उभ्या पिकांचं नुकसान झालं आहे. आजही राज्यात काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आज विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये रिमझिम पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते. मुंबईसह कोकण किनारपट्टी भागात उष्ण आणि ढगाळ वातावरणाचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.
उत्तर भारतात गारठा वाढला
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस तापमानात वाढ झाली होती, मात्र गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस आणि जोरदार थंड वारे यामुळे पुन्हा तापमानात अचानक घट झाली आहे. त्यामुळे दिल्ली, महाराष्ट्रात काही भागात सकाळ-संध्याकाळ थंडी पाहायला मिळत आहे. डोंगराळ भागात सुरु असलेल्या बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतात गारठा वाढला आहे. पश्चिमेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे हवामानात बदल झाला आहे.
काही दिवसानंतर तापमान वाढीची शक्यता
दरम्यान, 10 मार्चपासून पश्चिम हिमालयीन भागावर ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम होण्याची शक्यता हवामान खात्याने (IMD) वर्तवली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस डोंगराळ भागात पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, 11 मार्चपासून तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. उत्तराखंडमध्ये, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा बर्फवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.