महाराष्ट्रात सरसकट कर्जमाफीसाठी सरकारला विनंती करणार : शरद पवार
सरकारकडे धान्याचे साठे आहेत, धान्याची कमतरता नाही. त्यामुळे जोपर्यंत दुष्काळ परिस्थिती आहे, तोपर्यंत शासनाने सरसकट अन्नधान्यांचा दुष्काळी भागात पुरवठा करावा. त्यासाठी अन्नसुरक्षा कायद्यातील नियमात बदल करुन हा पुरवठा करावा, अशी मागणीही शासनाकडे करणार असल्याची माहिती शरद पवारांनी दिली.
बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज इंदापूर तालुक्यातील दुष्काळ दौऱ्यासाठी होते. इंदापूर तालुक्यातील कौठळी या गावी व शेटफळगडे या दोन गावांना त्यांनी भेट देऊन दुष्काळाबाबत ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी सरसकट कर्जमाफी करावी यासाठी सरकारला विनंती करणार असल्याचंही शरद पवारांनी सांगितलं.
संकटाच्या काळात राजकारण बाजूला ठेवून एकत्र यावं दुष्काळी दौर्यात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे देखील शरद पवार यांच्यासोबत होते. हाच मुद्दा पकडून शरद पवारांनी उपस्थितांना संबोधताना, अशा या दुष्काळी परिस्थितीत राजकारण व मतभेद विसरुन एकत्र यायचे नाही तर मग कधी यायचे असा एक प्रश्न शरद पवारांनी केला. हर्षवर्धन पाटील, आमदार दत्तात्रय भरणे आणि मी एकत्र आलो, असे पवारांनी म्हटल्यानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला.
महाराष्ट्रात सरसकट कर्जमाफीसाठी सरकारला विनंती करणार राज्यातील शेतकरी कर्जमाफी संदर्भात उद्या मुंबईत मुख्यमंत्र्याशी चर्चा करणार आहे. आम्ही 2008-09 साली 72 हजार कोटींची कर्जमाफी केली होती. आता आपण शासनाला सरसकट कर्जमाफी करा, अशी विनंती करु शकतो. सरकार कर्जमाफी करेल पण सरसकट करेल की नाही याबाबत शंका आहे. उद्या मुबंईत या विषयावर मुख्यमंत्री यांच्याशी या विषयावर चर्चा करणार आहे. केंद्रात काळजीवाहू सरकार असल्याने सरकार स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी संपूर्ण कर्जमाफी सरसकट करावी अशी विनंती करणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितलं.
सरकारकडे धान्याचे साठे आहेत, धान्याची कमतरता नाही. त्यामुळे जोपर्यंत दुष्काळ परिस्थिती आहे, तोपर्यंत शासनाने सरसकट अन्नधान्यांचा दुष्काळी भागात पुरवठा करावा. त्यासाठी अन्नसुरक्षा कायद्यातील नियमात बदल करुन हा पुरवठा करावा, अशी मागणीही शासनाकडे करणार असल्याची माहिती शरद पवारांनी दिली. तसेच इंदापूर दुष्काळग्रस्त भागात सांगेल तेवढे टँकर व म्हणेल त्या ठिकाणी टँकर देणार असल्याचं आश्वासन पवारांनी दिलं. सध्या अहमदनगर व सातारा जिल्ह्यात खाजगी संस्थाची मदत घेऊन अनेक भागात राष्ट्रवादीकडून टँकर सुरु असल्याचे त्यांनीं सांगितले.
शरद पवार एका गावाहून दुसऱ्या गावी जात असताना काही ग्रामस्थ रस्त्यालगत थांबले होते. शरद पवारांनीही गाडी थांबवत या सर्वांशी संवाद साधला. यावेळी ग्रामस्थांनी टँकर अधिक लावावेत, चारा छावण्या सुरू कराव्या, जनावरांचा पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न सोडवावा अशा अनेक दुष्काळी समस्या पवारांना बोलून दाखवल्या.