एक्स्प्लोर
नाशिक, नगरमधून जायकवाडीला पाणी सोडलं
सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत अहमदनगरच्या विखे पाटील सहकारी साखर कारखाना आणि इतरांची याचिका फेटळाली. त्यामुळे आता मराठवाड्याला 8 टीएमसी पाणी मिळणार आहे.
नाशिक/अहमदनगर : पाण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या मराठवाड्याची तहान अखेर भागणार आहे. समन्यायी पाणी वाटप धोरणानुसार नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधून आज सकाळपासून जायकवाडीला पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. पुढील सात ते आठ दिवस हे आवर्तन चालणार असल्याची माहिती अहमदनगर पाटबंधारे विभाचे मुख्य अभियंता किरण देशमुख यांनी दिली.
सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत अहमदनगरच्या विखे पाटील सहकारी साखर कारखाना आणि इतरांची याचिका फेटळाली. त्यामुळे आता मराठवाड्याला 8 टीएमसी पाणी मिळणार आहे.
मुळा, निळवंडे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु
अहमदनगरमधील भंडारदरा आणि मुळा धरणातून जायकवाडी साठी 5.75 टीएमसी इतके पाणी सोडले जाणार आहे. यात मुळा धरणातून आज 1.90 टीएमसी पाणी सोडण्यास सुरुवात झाली. मुळा धरणाच्या 11 दरवाज्यातून 6 हजार क्यूसेक इतक्या वेगाने पाणी मुळा नदी पात्रात सोडण्यात आले. पाण्याचा वेग आठ तासानंतर 8 हजार क्यूसेत तर रात्री बारा वाजता 12 हजार क्यूसेक असा वाढवला जाणार आहे. 3 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत ठरल्याप्रमाणे एकूण 1.90 टीएमसी पाण्याचा विसर्ग जायकवाडी धरणासाठी सोडण्यात येणार आहे. मुळा धरणावर चार बंधारे असून या ठिकाणी पाटबंधारे विभागाने तयारी केली आहे, तसेच जवळपास 100 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
तर निळवंडे धरणातूनही मराठवाड्याच्या दिशेने पाण्याचा प्रवास सुरु झाला आहे. पाच दरवाज्यातून 6000 क्यूसेकने पाणी सोडण्यात आलं. प्रवरा नदीतून 150 किमी असा पाण्याचा प्रवास असेल.
नाशिकमधूनही पाणी सोडलं
याशिवाय नाशिकमधील दारणा धरणातून 3000 क्यूसेक, मुकणे धरणातून 1000 क्यूसेक आणि गंगापूर धरणातून प्रती सेकंद 1000 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. या धरणांमधून दोन दिवस पाणी सोडलं जाणार आहे. तसंच पाणीचोरी होणार नाही, अशी उपाययोजनाही करण्यात आली आहे. हे पाणी प्रवरा संगममध्ये पोहोचायला 24 तास लागणार आहेत. तर पाणी नाशिकहून जायकवाडीला पोहोचायला अंदाजे अडीच दिवस लागतील. नदीकाठच्या गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसंच तीनही धरणावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान स्थानिकांचा विरोध लक्षात घेता पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी पाटबंधारे विभागाने केली आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिलं आहे. पाणी सोडताना कायदा सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशी विनंतीही पत्रात करण्यात आली आहे.
त्यामुळे धरणावर तसंच पाणी प्रवाहित मार्गावर चोख पोलीस बंदोबस्त असेल. तसंच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय पाणी चोरी रोखण्यासाठी मार्गावरील वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे.
एकूण किती पाणी सोडणार?
जायकवाडी धरणामध्ये विविध धरणांमधून पाणी सोडण्यात येणार आहे. त्यानुसार मुळामधून 54 दलघमी (1.90 टीएमसी), प्रवरामधून 109 दलघमी (3.85 टीएमसी), गंगापूर धरणातून 17 दलघमी (0.60 टीएमसी), दारणा धरणातून 57.50 दलघमी (2.04 टीएमसी), पालखेड समुहातून 170 दलघमी (60 टीएमसी) असं एकूण 254 दलघमी (8.99 टीएमसी) पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
Advertisement