वर्धा : राजकारण म्हटलं की टोकाचा विरोध असंच काहीसं चित्र डोळ्यांपुढं येत. पण राजकरणात अनेक व्यक्ती नात्या-गोत्याच्या पलीकडच्या ठरतात, त्यांच्यावर प्रचंड  विश्वास ठेवला जातो. हीच बाब केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी खासदार दत्ता मेघे यांच्या बाबतीत दिसतेय. मृत्यूपत्रात कुठं काही घोळ होवू नये याकरिता दत्ता मेघे यांच्या मृत्यूपत्रात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नाव लिहिलं असल्याचं गुपित खुद्द माजी खासदार दत्ता मेघे यांनीच जाहीररित्या उघड केलं. वर्ध्याच्या नगरपालिकेत विकासकामाचं ई-भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी त्यांनी ही गोष्ट उघड केली. 


माजी खासदार दत्ता मेघे म्हणाले की, "सर्व पक्षांशी मी चांगले संबंध प्रस्थापित केलं. नितीनजी आमच्या फॅमिलीचे महत्वाचे नेते आहेत. मी माझ्या मृत्यूपत्रात काही घोळ होऊ नये म्हणून त्यांचं नाव दिलं आहे." एका राजकारण्याने आपली हयात एका पक्षात घालवली आणि मृत्यूपत्रात नाव मात्र स्वत:च्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचं किंवा पूर्वाश्रमीच्या पक्षातील कोणत्याही नेत्याचं घातलं नाही, पण नवीन पक्षात प्रवेश केलेल्या नेत्याचे नाव घातलं ही आश्चर्याची गोष्ट आहे.  


दत्ता मेघेंच्या या मृत्यूपत्रात नितीन गडकरींचे नाव नेमकं का आणि कशासाठी टाकण्यात आलं आहे हे मात्र समजू शकलं नाही. गडकरींचे नाव मेघेनी वारसा म्हणून टाकलं की संपत्तीचे ट्रस्टी म्हणून टाकलं हे कळायला मार्ग नाही. 


आता उठता-बसता एकमेकांवर टीका करणारे, सत्ता येईल त्या पक्षात जाहीरपणे प्रवेश करणाऱ्या राजकारणांच्या एकमेकांवर आजिबात विश्वास नसतो. राजकारणात काहीही होऊ शकतं असं म्हटलं जातं. पण दत्ता मेघेंच्या मृत्यूपत्राच्या वक्तव्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. एका राजकारणी व्यक्तीचा दुसऱ्या राजकारणी व्यक्तीवर इतका विश्वास असतो का असा सवालही अनेकांना पडला आहे. मृत्यूपत्रात कुठं काही घोळ होऊ नये म्हणून आपण गडकरींचं नाव त्यामध्ये टाकत असल्याचं मेघे म्हणाले. म्हणजे मेघेंना स्वत:च्या कुटुंबापेक्षा नितीन गडकरी यांच्यावर जास्त विश्वास आहे का असा सवालही अनेकजण विचारत आहेत. 


दत्ता मेघे हे काँग्रेसच्या तिकिटावर चार वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. त्यानंतर ते काँग्रेसच्याच तिकिटावर राज्यसभेवर निवडून गेले आहेत. नंतरच्या काळात राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 


काय असतं मृत्यूपत्र? 
मृत्यूपत्र हे एक कायदेशीर दस्तऐवज असते ज्यात एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर तिची मालमत्ता आणि आर्थिक संपत्ती ज्या व्यक्तीला किंवा वारसाला मिळणार असते त्याचं नाव त्यामध्ये नमूद असतं. जी व्यक्ती हे दस्तऐवज कार्यान्वित करते, ती जीवंत असेपर्यन्त हे दस्तऐवज मागे घेऊ शकते, बदलू शकते किंवा त्याच्या जागी दुसरं एखादं मृत्यूपत्र निर्माण करू शकते.


महत्वाच्या बातम्या :