कोल्हापूर : पुणे-बंगळुरू महामार्ग यापुढे कधीच महापुराच्या पाण्यात जाणार नाही याची खात्री देतो, असे आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी कोल्हापूर येथील एका कार्यक्रमात दिले. पुणे-बंगळुरू महामार्गासाठी तब्बल 40 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. यावेळी कोल्हापुरात महापुराचा एक थेंब महामार्गावर येणार नाही याची काळजी घ्या, अशा सूचना नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या कार्यक्रमात झालेल्या गर्दीवरही नितीन गडकरी यांनी भाष्य केलं. एकाच मंडपात 100 लग्न व्हावी, अशी आज अवस्था झालीय. सगळेच आमदार, खासदार या कार्यक्रमाला उपस्थित आहे. सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील कामाबाबत एकच कार्यक्रम होत असल्याने गर्दी उसळल्याचे गडकरी म्हणाले.


पुणे-बंगळुरू महामार्ग यापुढे कधीच महापुराच्या पाण्यात जाणार नाही : गडकरी 
'पुणे-बेंगळुरू दरम्यान 40 हजार कोटी रुपये खर्च करून नवा महामार्ग विकसित केला जाणार आहे,' अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी पुण्यात केली होती. याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरात बोलताना पुणे-बंगळुरू महामार्ग यापुढे कधीच महापुराच्या पाण्यात जाणार नाही याची खात्री देतो, असे आश्वासन मंत्री नितीन गडकरी यांनी दिले. याच भाषणात कोल्हापूर-सांगली या रस्त्याचे पुढच्या सहा महिन्यात भूमिपूजन करून काम सुरू करु, असे आश्वासनही गडकरींनी दिलंय.


दरवर्षी पुणे-बंगळुरू महामार्ग पाण्यात..
गेल्या काही वर्षांपासून दरवर्षी पुणे-बंगळुरू महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीच्या पाण्यात जात आहे. जुलै महिन्यात महामार्गावर पाणी आल्याने चार दिवस संपूर्ण वाहतूक ठप्प होती. महामार्ग बंद झाल्याने रस्त्यांवर शेकडो वाहने अडकली होती. त्यामुळे यावर कायमस्वरुपी तोडगा काढणे महत्वाचे आहे. हा महामार्ग दोन राज्यांना जोडणारा असल्याने महत्वाची वाहतूक या रस्त्यावरुन होत असते. त्याचमुळे आता नवीन पुणे-बंगळुरू महामार्ग बांधणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.


मुंबईतून बारा तासांत दिल्ली'
'दिल्ली-मुंबई महामार्ग बांधण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्रातील काम सुरू व्हायचे आहे. हा महामार्ग नरिमन पॉइंटपाशी संपेल. तेथून बारा तासांत दिल्लीला जाता येईल. माझ्यासाठी भावनिकदृष्ट्या जवळचा वांद्रे-वरळी सागरी सेतू वसई-विरारपर्यंत वाढवता येईल,' अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली.