(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Wardha HinganGhat Case Update : हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील नराधमाला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा, न्यायालयाचा निर्णय
Wardha HinganGhat Case Update : हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील आरोपी विकेश नगराळे याला न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
Wardha HinganGhat Case Update : हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील दोषी विकेश नगराळेला आज मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. आजच्याच दिवशी या जळीतकांडात होरपळून पीडितेनं अखेरचा श्वास घेतला होता. आज दोन वर्षांनी नराधम विकेश नगराळेला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. आज खऱ्या अर्थानं पीडितेला न्याय मिळाला, असं म्हणता येईल. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयाच्या या निकालाची माहिती दिली
एकतर्फी प्रेमातून एका शिक्षिकेला जिवंत जाळण्यात आलेलं. या प्रकरणी दोषी असलेल्या विकेश नगराळेच्या शिक्षेवर आज सुनावणी पार पडली. कालच्या सुनावणीत आरोपीवरील गुन्हे सिद्ध झाल्यानंतर त्याला न्यायालयाच्या वतीनं दोषी ठरवण्यात आलं होतं. आज दोषी विकेश नगराळेला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
आम्हाला न्याय मिळाला नाही
न्यायालयाने जरी आपला निकाल दिला असला तरी आम्ही यावर समाधानी नसल्याचं पीडितेच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया आहे. आरोपीला या प्रकरणात फाशीची शिक्षा व्हायला हवी होती असं पीडितेच्या आईने म्हटलं आहे.
काय आहे हिंगणघाट घटना?
3 फेब्रुवारी 2020 रोजी आरोपी विकेश नगराळेनं एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेला पेटवलं होतं. 10 फेब्रुवारीला तिचा मृत्यृ झाला होता. या गुन्ह्यात दोषी ठरलेल्या विकेशला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी होत होती. या प्रकरणी 426 पानांचं दोषारोपपत्र, 64 सुनावणी, 29 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. महत्वाचं म्हणजे, पीडित तरुणीच्या मृत्यूला 2 वर्ष पूर्ण होताना काल हा निकाल दिला जाणार होता. परंतु, आता दोषी विकेशच्या शिक्षेवर आज सुनावणी पार पडली. दरम्यान, प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत सरकारनं विशेष सरकारी वकिल म्हणून उज्वल निकमांची नियुक्ती केली होती.
विशेष म्हणजे, 29 साक्षीदारांपैकी एकही साक्षीदार फितूर झालेला नाही. त्यामुळे आरोपीचा दोष सिद्ध करण्याइतपत भक्कम पुरावे असून ते सरकारी पक्षानं न्यायालयापुढे सादर केल्याचे दीपक वैद्य म्हणाले होते. अखेर न्यायालयानं पुराव्यांच्या आधारे विकेश नगराळेला दोषी सिद्ध केलं होतं.
3 फेब्रुवारी 2020 रोजी हिंगणघाट येथे दोषी विकेश नगराळेनं एकतर्फी प्रेमातून प्राध्यापिका तरुणीवर पेट्रोल टाकून पेटवलं होतं. यांत गंभीररित्या जखमी झालेल्या पीडित प्राध्यापिका तरुणीचा उपचारादरम्यान 10 फेब्रुवारी 2020 रोजी मृत्यू झाला होता. या जळीतकांड प्रकरणाच्या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली होती. दोषी विकेश नगराळेविरोधात तब्बल 426 पानांचे दोषारोपपत्र हिंगणघाटच्या प्रथम श्रेणी न्यायालयात दाखल केलं होतं. या प्रकरणात आतापर्यंत 29 साक्षीदार तपासण्यात आले आहेत. आज पीडित प्राध्यापिकेचा द्वितीय स्मृतिदिन आहे. अशातच आज पीडितेच्या दोषीला शिक्षा सुनावण्यात आली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha