विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा शालेय पोषण आहार, शिवसेना आक्रमक, वर्ध्यातील प्रकार
वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील नाचणगाव येथील यशवंत शाळेत निकृष्ट दर्जाचं शालेय पोषण आहार दिला जात असल्याचा प्रकार उघड झाला. यानंतर शिवसेना आक्रमक झाली आहे.
Wardha News Updates: वर्धा जिल्ह्यातील नाचणगाव (Wardha Nachangaon News) येथील यशवंत हायस्कूल (Yashwant High School) येथे विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा शालेय पोषण आहार दिला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत या प्रकाराची माहिती मिळताच शिवसैनिकांनी थेट शाळेत धडक दिली आणि पोषण आहाराकरता शिजवलेल्या खिचडीचं वाटप बंद केलं. निकृष्ट आहार विद्यार्थ्यांना दिला जाऊ नये, याबाबत शिवसैनिकांनी समजही दिली.
पालकांनी केली होती तक्रार
दोन दिवसांपासून विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाची खिचडी मिळत असल्याची पालकांनी तक्रार केली होती. याची माहिती शिवसेनेचे कार्यकर्ते सतीश बोरसे पाटील, कैकाडी यांना मिळाली. यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले.
शिवसेनेच्या शिष्टमंडळाने प्रत्यक्ष शाळेत धडक देऊन तेथील अन्नधान्याची पाहणी केली. यावेळी शाळेत मुगाची डाळ आणि हरभऱ्याचे धान्य अतिशय निकृष्ट दर्जाची तसेच बुरशी असलेली आढळून आली. तसेच शिजवण्यात आलेली खिचडी सुद्धा निकृष्ट दर्जाची असल्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तिचा विद्यार्थ्यांना वाटप बंद केलं. या प्रकाराविषयी पालकांनी संताप व्यक्त केला आहे. पालकांनी याविषयी शाळा प्रशासनाला माहिती देखील दिली होती.
शिवसैनिकांचा आंदोलनाचा इशारा
विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराकडे शाळेचे लक्ष नसल्याचे चित्र यशवंत शाळेत दिसत असून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ येथे सुरू आहे. शिवसेना हा संपूर्ण प्रकार येथे यापुढे चालू देणार नाही तसेच निकृष्ट पोषण आहार मिळत असल्याची तक्रार सुद्धा शिवसेना वरिष्ठांकडे करेल आणि विद्यार्थ्यांना पोषक आणि चांगला आहार पुरवला गेला नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशारा शिवसेनेच्या सतीश बोरसे पाटलांनी शालेय प्रशासनाला दिला आहे. शिवसेनेनं हे प्रकरण उचलून धरलं असून अशा प्रकारे शाळेत निकृष्ट दर्जाचं शालेय पोषण आहार देणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी देखील होऊ लागली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
मुलांना वेठबिगार बनवलं जातंय, हे प्रगत महाराष्ट्राला शोभणारं नाही, दखल घ्या अन्यथा...; राज ठाकरेंचा इशारा