एक्स्प्लोर
चोरीच्या संशयावरुन चिमुकल्याला गरम टाईल्सवर बसवलं, पार्श्वभागाला गंभीर दुखापत
आर्वीमधल्या जोगनामाता मंदिर परिसरात चिमुकला खेळत होता. त्यावेळी उमेश उर्फ अमोल ढोरेने मुलाचे कपडे काढून मारहाण केली आणि मंदिर परिसरातीलच टाईल्सवर बसवलं.
वर्धा : मंदिरात चोरीच्या संशयावरुन एका आठ वर्षीय मुलाला गरम टाईल्सवर बसवल्याने त्याच्या पार्श्वभागाला गंभीर दुखापत झाली आहे. वर्धा जिल्ह्याच्या आर्वी इथे ही घटना घडली. हे अमानुष कृत्य करणाऱ्या गुन्हेगाराला पोलिसांनी काही तासात अटक केली.
आर्वीमधल्या जोगनामाता मंदिर परिसरात चिमुकला खेळत होता. त्यावेळी उमेश उर्फ अमोल ढोरेने मुलाचे कपडे काढून मारहाण केली आणि मंदिर परिसरातीलच टाईल्सवर बसवलं. टाईल्स गरम असल्याने काही वेळातच चिमुकल्याच्या पार्श्वभागाला गंभीर दुखापत झाली.
जखमी चिमुकला घरी पळत गेला आणि आईजवळ ओक्साबोक्शी रडू लागला. चिमुकल्याची दुखापत पाहून आईला धक्काच बसला. आईने चिमुकल्याच्या वडिलांना संपर्क करत त्याला रुग्णालयात नेलं. यावेळी आईने अमोल ढोरेला जाब विचारला असता, त्याने मुलावर चोरीचा आळ घेतला. शिवाय शिवीगाळ करत अंगावर धावून आल्याचं आईने सांगितलं.
मुलाच्या वडिलांच्या तक्रारीवरुन आर्वी पोलिसांनी वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी उमेश उर्फ अमोल ढोरेला अटक केली आहे. अमोल ढोरेची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची असून त्याच्यावर यापूर्वी दारुविक्रीचे गुन्हे नोंद असल्याचं पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. चिमुकल्यासह त्याच्या कुटुंबियांची विविध सामाजिक संघटनांनी भेट घेत मदतीची तयारी दर्शवली आहे. चिमुकल्यावर आर्वीच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. मंदिरातील दानपेटी कुलूपबंद आहे आहे. त्यामुळे गुन्हेगाराने केलेल्या आरोपांतील सत्यतेबाबत संशय व्यक्त होत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
महाराष्ट्र
बीड
Advertisement