(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pandharpur : विठुराया निघाले भक्ताच्या भेटीला... देवाच्या पादुकांचे संत सावता महाराजांच्या अरणकडे प्रस्थान
Pandharpur News : आपल्या काळ्या आईला विठ्ठल मानून भक्ती करणारे संत सावता महाराज कधीच पंढरपूरला येत नसत. त्यामुळेच आपल्या या लाडक्या भक्ताच्या भेटीला स्वतः देव जात असत अशी मान्यता वारकरी संप्रदायात आहे.
Pandharpur News : आषाढी सोहळ्यासाठी राज्यभरातून सर्व संतांचे पालखी सोहळे पंढरपूरमध्ये येत असतात मात्र याला अपवाद असतो तो संत सावता माळी यांचा. आपल्या काळ्या आईला विठ्ठल मानून भक्ती करणारे संत सावता महाराज कधीच पंढरपूरला (Pandharpur) येत नसत. त्यामुळेच आपल्या या लाडक्या भक्ताच्या भेटीला स्वतः देव जात असत अशी मान्यता वारकरी संप्रदायात आहे. परंपरेनुसार आज विठुरायाच्या पादुका शेकडो वारकऱ्यांसमवेत अरणकडे निघाल्या आहेत.
म्हणून देव स्वतः सावता महाराजांच्या भेटीला जातो...
कांदा मुळा भाजी .. अवघी विठाई माझी म्हणत आपल्या शेतात काबाडकष्ट करणाऱ्या सावता महाराजांच्या तोंडात कायम विठ्ठलाचे नामस्मरण असे. माढा तालुक्यातील अरण हे सावता महाराजांची जन्म आणि कर्मभूमी आहे. येथे काळ्या आईची सेवा करताना सावता महाराजांनी अनेक अजरामर अभंग रचना केल्या आहेत. संत आपल्याकडे येत नाही म्हणून मग देव स्वतः सावता महाराजांच्या भेटीला जात असतो. आषाढी एकादशी नंतर येणाऱ्या कृष्ण पक्षाच्या एकादशीला पंढरपुरातील काशीकापडी समाज या पादुका घेऊन जात असतो. देवाच्या या पादुका शेकडो वर्षांपासून या समाजाकडे असल्याने हा समाज वारकऱ्यांसमवेत देवाच्या पादुका रथात घेऊन अरणकडे जात असतो.
आषाढ कृष्ण चतुर्दशीला अरण येथे संत आणि देव भेटीचा अनोखा सोहळा
आज सकाळी शेकडो वारकऱ्यांच्या उपस्थितीत काशीकापडी समाजाच्या मठात असणाऱ्या पादुका पालखीत घेऊन वाजत गाजत मुख्य मार्गावरील रथात ठेवण्यात आल्या. यानंतर नगर प्रदक्षिणा करत या पादुका विठ्ठल मंदिरात आणून देवाजवळ ठेवण्यात आल्या. यानंतर देवाच्या या पालखी सोहळ्याने ग्यानबा तुकारामच्या जयघोषात अरणकडे प्रस्थान ठेवले. आता रोपळे, आष्टी असे मुक्काम करत संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथी दिवशी म्हणजे आषाढ कृष्ण चतुर्दशीला अरण येथे पोहोचते. या दिवशी संत आणि देव भेटीचा अनोखा सोहळा अरण येथील सावता महाराजांच्या मंदिरात पार पडतो. दुसऱ्या दिवशी म्हणजे पौर्णिमेला इथे श्रीफळ हंडी आणि काल्याचा कार्यक्रम करुन पुन्हा देव पंढरपूरकडे प्रस्थान ठेवतात.
संतांच्या भेटीला साक्षात पांडुरंग जातात असा हा अनुपम सोहळ्याची व्याप्ती वाढवण्यासाठी मंदिर समिती आणि प्रशासनाने प्रयत्न करावेत अशी मागणी सावता परिषदेचे अध्यक्ष कल्याण आखाडे यांनी यावेळी केली आहे. दरवर्षी सावता परिषदेकडून या पालखीत सहभाग नोंदवला जात असतो. देव संतांच्या भेटीला जाणे हा सर्वात मोठा सोहळा असून याकडे मंदिर समिती आणि प्रशासन यांनी दुर्लक्ष न करता वारकरी संप्रदायाच्या या अनोख्या सोहळ्यासाठी सर्व सोयी पुरवण्याची मागणी एखादे यांनी केली आहे.
VIDEO : Pandharpur : संत सावता माळींच्या भेटीसाठी विठुराया अरणकडे प्रस्थान ठेवणार