कशासाठी तेढ निर्माण करणारी वक्तव्य करतायत; विनोद पाटलांनी भुजबळांना सुनावले
Vinod Patil : ज्यांच्या नोंदी नसतील अशा सर्वांसाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत न्यायालयीन लढाई लढणार आहे.
Vinod Patil On Chhagan Bhujbal : ओबीसीला धक्का लागणार नाही असे म्हणतात आणि मागच्या दाराने एन्ट्री करतात, अशी टीका मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) बाबतीत काढण्यात आलेल्या अध्यादेशावरून केली होती. त्यांच्या याच टीकेला मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील (Vinod Patil) यांनी उत्तर दिले आहेत. “ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कोणताही निर्णय झाला नसतांना, कशासाठी तेढ निर्माण करणारी वक्तव्य करत आहात असा टोला विनोद पाटील यांनी भुजबळांना लगावला आहे.
दरम्यान भुजबळांच्या वक्तव्यावर बोलतांना विनोद पाटील म्हणाले की,“राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगेसोयरेबाबत जे पत्रक काढले आहे. त्याबद्दल मी सरकारचं स्वागत करतो. माझे सहकारी मित्र मनोज जरांगे पाटील यांचे देखील अभिनंदन करतो. आताच एक बातमी पाहिली की, मंत्री छगन भुजबळ यांनी एक वक्तव्य केले आहे.'मागच्या दारातून मराठा समाजाला ओबीसी करण्याचा प्रयत्न सुरू असून, यासाठी गरज पडल्यास न्यायालयात लढाई लढणार असल्याचे भुजबळ म्हणाले आहेत'. भुजबळ यांना माझा सवाल आहे की, छातीवर हात ठेवून सांगा, खरोखरच संपूर्ण मराठा समाज ओबीसीमध्ये आला आहे का?, खरोखर 54 लाख गुणिले चार लोकांना याचा फायदा होणार आहे का?, खरोखरच फार मोठा बदल या निर्णयामुळे होणार आहे का?, तुम्हाला सर्व हकीगत माहित आहे. मग कशासाठी तेढ निर्माण करणारी वक्तव्य आपण करत आहात, असे विनोद पाटील म्हणाले.
शेवटच्या श्वासापर्यंत न्यायालयीन लढाई लढणार
पुढे बोलतांना विनोद पाटील म्हणाले की, 'छगन भुजबळ जबाबदार मंत्री आहेत. मराठा समाजाला ओबीसीमध्ये सामावून घेण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही. मग कशासाठी छगन भुजबळ न्यायालयीन लढाईची भाषा करतात. त्यामुळे मराठा समाजाला मी विनंती करतो की, ज्यांच्या नोंदी नसतील अशा सर्वांसाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत न्यायालयीन लढाई लढणार आहे. मला विश्वास आहे क्युरेटीव्ह पिटीशनचा निर्णय समाजाच्या बाजूने येणार आहे. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या नाही, अशा उरलेल्या सर्व मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. येणारी शिवजयंती ही मराठा आरक्षणानेच साजरी होईल असा शब्द देतो, असे विनोद पाटील म्हणाले.
भुजबळ काय म्हणाले?
सगेसोयरे हे कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाहीत. ओबीसी आरक्षणामध्ये आल्याचा मराठ्यांना आनंद वाटेल. पण 17 टक्क्यांत सर्व येतील. ईडब्ल्यूएसमध्ये, ओपनमध्ये जे आरक्षण मिळत होते ते मिळणार नाहीत. 50 टक्क्यांत जे खेळत होतात ती संधी आता गेली. 50 टक्क्यांत मराठा समाज, ब्राह्मण आणि जैन समाज होता, त्यावर पाणी सोडावे लागले. ओबीसीला धक्का लागणार नाही असे म्हणतात आणि मागच्या दाराने एन्ट्री करतात. जात ही जन्माने येते एफिडेविटने येत नाही.
इतर महत्वाच्या बातम्या: