Raksha Khadse : आठ वर्षात आमचे गाव कधी दिसले नाही का? खासदार रक्षा खडसेंच्या पाहणी दौऱ्यात ग्रामस्थांचा गदारोळ
विविध समस्या जाणून घेण्यासाठी भाजपच्या खासदार रक्षा खडसे या चोपडा तालुक्यात बिडगाव येथे गेल्या होत्या. यावेळी त्यांना गावकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावं लागलं.
Raksha Khadse : शासकीय योजना ग्रामीण भागात पोहोचत आहेत का? यासह विविध समस्या जाणून घेण्यासाठी भाजपच्या खासदार रक्षा खडसे या चोपडा तालुक्यात बिडगाव येथे गेल्या होत्या. यावेळी त्यांना गावकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावं लागलं. एवढी वर्ष कुठे होता, म्हणत रक्षा खडसेंच्या या पाहणी दौऱ्यात ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. रक्षा खडसे यांनी ग्रामस्थांना शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र, गोंधळ सुरुच राहिल्याने काही वेळ थांबून रक्षा खडसे यांनी या गावातून काढता पाय घेतला.
रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांचा चोपडा तालुका दौरा सुरु आहे. शुक्रवारी सकाळी त्या कार्यकर्त्यांच्या ताफ्यासह बिडगाव आणि वरगव्हान येथे आल्या होत्या. आठ वर्षांत आमचे गाव कधी दिसलेच नाही का ? आठ वर्ष कुठे होता. असा मुद्दा उपस्थित करुन ग्रामथ्यांनी त्यांच्यासमोर गदारोळ केला.
सद्या रक्षा खडसे यांचा पाच दिवसांचा चोपडा तालुक्यातील गावभेटीचा दौरा सुरु आहे. याच दौऱ्यात दुसऱ्या दिवशी शुक्रवार सकाळी धानोरा, मोहरद, बिडगाव, वरगव्हान या गावांना भेट देण्यासाठी सकाळी 10 वाजल्यापासून आल्या होत्या. यावेळी धानोरा, मोहरद येथील भेटी आटोपून त्या बिडगाव येथे आल्या असता ग्रामपंचायत आवारात मोठी गर्दी जमली होती. त्यांचा कार्यक्रम सूरु होताच काही ग्रामस्थांनी गदारोळ केला. खासदार रक्षा खडसे या गेल्या आठ वर्षांपासून आमच्या गावात एकदाही आल्या नाहीत. तुम्ही कुठे होतात. आमचे गाव कधी दिसले नाही का? अनेक वेळा समस्यांसाठी फोन करुनही समस्या सोडवणे तर दुरच पण प्रतिसादही मिळत नसल्याने ग्रामस्थांनी चांगलाच गदारोळ केला. बिडगाव प्रमाणेच वरगगव्हान गावातही हेच चित्र पहायला मिळाले. सुरक्षा रक्षकांनी गर्दी शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र तरीही गदारोळ थांबत नाही.
रावेल लोकसभा मतदारसंघात 1 हजार 400 गावे आहेत. प्रत्येक गावात जाणे कठीण जाते. मात्र, त्यामुळे कामे होत नाही असे नाही. आपल्या समस्या सोडविण्यासाठीच मी आले आहे. शांततेत प्रश्न मांडा असे आवाहन रक्षा खडसे यांनी केले. मात्र, गदारोळ सुरुच राहिल्याने त्यांनी बिडगाव येथून काढता पाय घेतला. यावेळी घाईगर्दीतच सरपंच विजया पाटील यांनी त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. उपसरपंच राजू साळुंके, ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक सरिता पाडवी व ग्रामस्थ हजर होते. तर त्यांच्या सोबत भाजपचे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्तेही उपस्थित होते.