'चंद्रकांत दादा चंपारण्यातील पात्र, जे फिरत राहतं', वडेट्टीवारांची खोचक टीका
"देवेंद्रजी, मी कोल्हापूरला परत जाणार आहे," असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्यानंतर राजकीय वर्तुळात त्यांच्या या वक्तव्याची चर्चा रंगली आहे. त्यावर चंद्रकांत दादा हे चंपारण्यातील पात्र जे फिरत राहत, अशी खोचक टीका मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
अहमदनगर : चंद्रकांत पाटील हे बुड नसलेलं नेतृत्व आहे. त्यांनी पुण्यात नाहीत तर कोल्हापूरमध्ये कुठं तरी स्थिर व्हावं. चंद्रकांत दादा हे चंपारण्यातील पात्र जे फिरत राहत, अशी खोचक टीका मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. "देवेंद्रजी, मी कोल्हापूरला परत जाणार आहे," असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी काल (25 डिसेंबर) पुण्यातील अटल संस्कृती गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात केलं होतं. त्यानंतर राजकीय वर्तुळात त्यांच्या या वक्तव्याची चर्चा रंगली आहे. त्यावर प्रतिक्रिया विचारली असता वडेट्टीवार यांनी हा टोला लगावला.
मुंबई लोकल सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री आग्रही मुंबई लोकलबाबत बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, मुंबई लोकल सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री आग्रही आहेत. 10 तारखेपर्यंत सर्व अहवाल आणि नवीन कोरोनाची स्थिती पाहून लोकल सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल, असं ते म्हणाले.
एकनाथ खडसेंना ईडीच्या नोटिशीबाबत बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, खडसेंना ED ची नोटीस म्हणजे भाजपची भूमिकाच ही आहे. OBC च्या नेतृत्वाला मोठं होऊ द्यायचं नाही. पक्षात बदला घेण्याची भूमिका वाढली आहे. मतभेद असावेत मनभेद असू नयेत. जी भूमिका सध्या ते घेत आहेत भविष्यात त्यांना देखील याच गोष्टीची अडचण होणार आहे, असं वडेट्टीवार म्हणाले.
मी पुन्हा जाईन म्हणणाऱ्यांना पुणेकरांनी बोलावलंच कुठे होतं? : अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला
पुणेकरांनी बोलावलंच कुठे होतं?- उपमुख्यमंत्री अजित पवार "मी पुन्हा जाईन म्हणणाऱ्यांना पुणेकरांनी बोलावलंच कुठे होतं?" असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे. अजित पवार म्हणाले की, "एक जण म्हणतो मी पुन्हा येईन, एक म्हणतो मी पुन्हा जाईन, मी पुन्हा येईन पण म्हणणार नाही, मी पुन्हा जाईन पण म्हणणार नाही...मी जनतेच्या सहकार्याने काम करत राहिन." चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले की, "मी पुन्हा जाईन म्हणणाऱ्यांना पुणेकरांनी बोलावलंच कुठे होतं? पाच वर्षांसाठी तुम्हाला निवडून दिलंय, वर्षाच्या आतच तुम्ही पुन्हा जाईन म्हणताय. मग काम घेऊन आलेल्या कोथरुडकरांना मी पुन्हा जाणार सांगणार का?"
देवेंद्रजी... मी कोल्हापूरला परत जाणार- चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते? पुण्यातील कार्यक्रमात मी कोल्हापूरला परत जाणार असं खेळीमेळीतच चंद्रकांत पाटील वक्तव्य केलं होतं. "पुण्यात प्रत्येकालाच सेटल व्हावंसं वाटतं. पण, देवेंद्रजी मी कोल्हापूरला परत जाणार आहे, असं म्हणत पाटील यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं. कोल्हापूरच्या मतदारसंघाकडे पाठ फिरवत पाटील यांनी पुण्यातील कोथरुड मतदारसंघाची निवड करत सोपी खेळी खेळली अशा आशयाचे अनेक आरोप त्यांच्यावर करण्यात आले होते. किंबहुना हे आरोप सातत्याने सुरुच आहेत. परिणामी राजकीय कारकिर्दीतील पुढची निवडणूक ही कोल्हापुरातूनच लढणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.