Neelam Gore: सीमावादावर महाराष्ट्राच्या विधीमंडळात प्रस्ताव मांडला जाईल; उपसभापती नीलम गोऱ्हे यांची माहिती
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, दोन्ही सभागृहाचे विरोधीपक्ष नेते यांना या संबंधित प्रस्ताव मांडावा अशी सूचना केली होती, ती मान्य करण्यात आल्याची माहिती विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिली.
मुंबई: सीमावादावर महाराष्ट्राच्या विधिमंडळात राज्य शासनाकडून प्रस्ताव मांडला जाईल अशी माहिती विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे. सर्व पक्षाच्या नेत्यांना पत्राच्या माध्यमातून विनंती करत सीमावासियांसोबत संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे असा एक ठराव विधिमंडळात सर्व संमतीने करावा अशी सूचना केली होती. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ती सूचना मान्य करत शासनाच्या वतीने कर्नाटक सीमाप्रश्नी महाराष्ट्राच्या विधिमंडळात एक ठराव मांडला जाईल असं मान्य केल्याची माहिती नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे.
राज्य शासनाच्या वतीनं मांडण्यात येणाऱ्या या ठरावाच्या माध्यमातून कर्नाटकची जी मनमानी सुरू केली आहे त्याबद्दल ही चर्चा व्हावी, तिथला अविकसित भाग विकसित करण्यासाठी काय केले पाहिजे याचाही विचार त्या ठरावात व्हावा, तसेच सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनीही विविध आयुधांच्या माध्यमातून सीमाप्रश्न उपस्थित करावा अशी अपेक्षा नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली.
हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीबद्दल कामकाज सल्लागार समितीमध्ये चर्चा झाली आहे. काही सदस्यांनी 4 ते 5 जानेवारीपर्यंत अधिवेशन सुरू ठेवावं अशी मागणी केली होती. मात्र सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षात सर्वानुमते कालावधी ठरविण्यात आलेला आहे. त्यामुळे मी भाष्य करणे योग्य नाही असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या. त्या म्हणाल्या की, "मिळालेल्या कालावधीचा योग्य वापर करणे हे जास्त महत्त्वाचे असून सभागृहात कोणीही गोंधळ जाणूनबुजून करत नाही. पुरेशी उत्तरं मिळत नाहीत असं विरोधी पक्षाला वाटतं तेव्हा गोंधळ होतो. तर काही वेळेला विरोधी पक्ष चर्चा वेगळ्याच वळणावर नेत आहे असं सत्ताधाऱ्यांना वाटतं, तेव्हा गोंधळ होतो. गोंधळ झाला तरी मार्ग काढण्याची तयारी आपण ठेवतो. अधिवेशनात जास्तीत जास्त कामकाज व्हावं अशी भूमिका सर्व पक्ष ठेवतील अशी अपेक्षा आहे."
नागपूरमधील प्राध्यापक प्रकरणी शंका उपस्थित
नागपूर विद्यापीठात प्राध्यापकांकडून खंडणी वसुलीचे प्रकरण अत्यंत गंभीर असून तुमच्या विरोधात तक्रार आली आहे असं सांगून कोणीतरी व्यक्ती प्राध्यापकाकडून पैसे घेते हे गंभीर आहे. ज्यांनी पैसे दिले त्या प्राध्यापकांनी त्यांच्या विरोधात खरोखर तक्रार आली आहे का याची माहिती कुलगुरू किंवा प्र-कुलगुरूंकडे विचारणा का केली नाही? आपण चुकीचे काहीच केलेले नाही मग आपल्या विरोधात तक्रार होऊच शकत नाही असा विचार पैसे देणाऱ्या प्राध्यापकांनी का केला नाही? त्यांनी पैसे का दिले असा प्रश्न उपस्थित करत नीलम गोऱ्हे यांनी सर्व प्रकरणाबद्दल शंका उपस्थित केली. आपण कुलगुरूंना स्पष्ट सूचना दिल्या आहेत, तसेच उच्च व तंत्रशिक्षण विभागालाही सूचना दिल्या आहेत. या प्राध्यापकांनी मुळात कोणत्या गोष्टीला घाबरून पैसे दिले याची चौकशी केली पाहिजे. पोलिसांनी या प्रकरणी लक्ष घालावे अशी सूचना करणार असल्याचं नीलम गोऱ्हे म्हणाल्या.