Vidhan Parishad Election 2022 : फडणवीस यांनी ऐनवेळी स्ट्रॅटेजी बदलली?; उमा खापरेंचा पराभव होण्याची शक्यता
MLC Election 2022 : काही दिवसांपासून भाजप आणि मविआकडून मतदानासाठी स्ट्रॅटेजी आखण्यात आली होती. पण मतदान सुरु असताना आता भाजपची स्ट्रॅटेजी बदलली असल्याची महिती आहे. यामुळे या निकालाकडे लक्ष लागलं आहे.
Vidhan Parishad Election 2022 : विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान सुरु आहे. राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधानपरिषदेतही धक्कादायक निकालाची परंपरा कायम राहणार का हे काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे. एकूण 10 जागांसाठी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. यात भाजप आणि काँगेसमध्ये रस्सीखेच आहे. त्यात गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि महाविकास आघाडीकडून मतदानासाठी स्ट्रॅटेजी आखण्यात आली होती. त्यात मतदान सुरु असताना आता भाजपची स्ट्रॅटेजी बदलली असल्याची महिती आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवार उमा खापरे यांचा पराभव होण्याची शक्यता आहे.
मतदान सुरु असताना विधानभवनात देवेंद्र फडणवीस यांनी ऐनवेळी स्ट्रॅटेजी बदलली. चौथ्या आणि पाचव्या पसंतीच्या क्रमांकात अदलाबदल झल्याची महिती आहे. उमा खापरे यांच्याऐवजी प्रसाद लाड यांना पसंती मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजप आमदारांना पसंती देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या त्यानुसार मतदान झालं आहे. प्रसाद लाड यांना विधानपरिषदेचा दांडगा अनुभव असल्याने ही रणनीती आखल्याचे बोलले जात आहे.
भाजपच्या पक्षीय संख्याबळाचा विचार करता भाजपचे चार उमेदवार कटाकटी निवडून येतील. पाचव्या जागेसाठी भाजपचे एकही मत शिल्लक नसताना भाजप हा चमत्कार कसा घडवून आणणार? हा प्रश्न होता. त्यात कॉंग्रेसच्या भाई जगताप यांच्यासमोर भाजपने तुल्यबळ उमेदवार म्हणून प्रसाद लाड यांना संधी दिली होती. अशावेळी भाजपची सर्व भिस्त होती, ती अपक्ष आमदार आणि मविआकडून फुटणाऱ्या मतांवर, मात्र हवे असलेली मते अरेंज झाली नसल्याने आता प्लॅन भाजपने चेंज केला आहे.
छोटे पक्ष आणि अपक्ष मिळून 29 आमदार आहेत. या सर्वांनी भाजपला मतदान केले तर निवडणूक भाजपसाठी सोपी होईल असं बोललं जात होतं. मात्र असं झालं नाही. कारण मविआच्या संपर्कात सुद्धा यातले काही आमदार आहेत. भाजप तांत्रिक डावपेच खेळून ही निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची चर्चा होती. मात्र ते ही न झाल्याने आता भाजपने पाच उमेदवार उभे केले होते. त्यातील उमा खापरे यांना मत न देता प्रसाद लाड यांना देण्याचा सूचना ऐनवेळी केल्याचे समजते. त्यानुसारच मतदान झालं आहे अशीही माहिती मिळत आहे. त्यामुळे भाजपचे सहज चार उमेदवार निवडून येतील, त्यात लाड यांचा नंबर आहे, उमा खापरे यांचा पत्ता कट होणार आहे अशी चर्चा आहे. मात्र निकाल काही तासांतच समोर येणार आहे, त्यामुळे निकाल काय लागतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.