सांगली : देशभरात कोरोनाने थैमान घातले असून बळींची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर भारतात आणि पर्यायाने महाराष्ट्रात हायअलर्ट जाहीर करण्यात आले आहे. मात्र तरी देखील महाराष्ट्रामध्ये कोरोनाबधित रुगणाची आणि बळींची संख्या वाढली आहे. जगात कोरोनाबधितांचा आकडा झपाट्याने वाढल्याने आणि जेवढे रुग्ण वाढले तेवढी उपचार यंत्रणा आणि खासकरून व्हेंटिलेटर नसल्यानं मृत्यूचा आकडा वाढतो आहे. हाच धोका भारतात आणि महाराष्ट्र निर्माण होऊ शकतो. नेमका हाच धोका ओळखून वैद्यकीय उपकरणे बनवणऱ्या सांगलीतील सांगलीतील प्रसाद आणि आदिती कुलकर्णी या मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या दाम्पत्याने स्वदेशी कम्प्रेसरचलीत व्हेंटिलेटर बनवला आहे.


सांगलीत एका रुगणाची शस्त्रक्रिया करत असताना या व्हेंटिलेटरचा वापर केला गेला. वैद्यकीय उपकरणे बनवणाऱ्या या दाम्पत्याने कोरोनाचा महाराष्ट्रभरात वाढता प्रादुर्भाव आणि व्हेंटिलेटरची असलेली कमी या सर्व पार्श्वभूमीवर प्रयोग करत या व्हेंटिलेटरची निर्मिती केली आहे. गंभीर संसर्ग झालेल्या कोविड रूग्णाला व्हेंटिलेटरची जास्त आवश्यकता असते. मात्र बाहेरच्या देशात फक्त जितक्या संख्येने कोरोना रुग्ण आढळून आले त्या प्रमाणात व्हेंटिलेटर नसल्याने त्या देशात कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे दिसते. हीच बाब लक्षात घेऊन आणि देशात कोरोनाचे झपाट्याने वाढत असलेले रुग्ण पाहता आपल्याकडे देखील व्हेंटिलेटरची संख्या वाढवणे गरजचे आहे.

प्रसाद आणि आदिती कुलकर्णी या अभियंता जोडप्याला वैद्यकीय उपकरणे तयार करण्याचा सुमारे दोन दशकांचा अनुभव आहे. या जोडप्याने सध्याच्या आणीबाणीच्या परिस्थितीत कोरोना रुग्णांचे जीव वाचवण्यास मदत होईल असे आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या तोडीचेच रिझल्ट देणारे भारतीय बनावटीचे व्हेंटिलेटर तयार केले आहे. शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता सांगलीतील कोरोनाच्या साथीला आळा घालण्यासाठी शासनाने नियुक्त केलेल्या विशेष वैद्यकीय अधिकारी पल्लवी सापळे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. संजय साळुंखे यांनी या व्हेंटिलेटरची पाहणी केली आहे. त्यांनी सुचवलेले बदल करुन पुन्हा हे मशिन मान्यतेसाठी शासनाच्या तांत्रिक समितीला दाखवले आहे. त्यांची मान्यता आल्यानंतर या मशिनचे उत्पादन सुरु करण्यात येणार आहे.

आज युरोप, अमेरिका, ब्रिटनमध्ये कोरोनाचे थैमान सुरु आहे. अक्षरश: शेकडो बळी कोरोनाचा विषाणू दिवसागणिक घेत आहे. कोरोनाग्रस्त रुग्णाला श्‍वसनाचा त्रास होऊ लागल्यास व्हेंटिलेटर लावावे लागते. या देशांच्या पुढची समस्या हीच आहे की, मोठ्या संख्येने व्हेंटिलेटर कुठून उपलब्ध करायचे. यावर जगभरात वेगाने संशोधन सुरु असताना यामध्ये सांगलीतील मेकॅनिकल अभियंता असलेले प्रसाद कुलकर्णी तसेच इलेक्‍ट्रीकल अभियंता असलेल्या आदिती कुलकर्णी यांनी कमी खर्चाचे जास्त काळ चालणारे व्हेंटिलेटर बनवले आहे. परदेशी व्हेंटिलेटरची किंमत पाच ते पंधरा लाख रुपये असताना हे व्हेंटिलेटर अवघ्या 50 हजारात उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे सध्या भारताला असलेली व्हेंटिलेटरच्या तुटवड्याची मोठी समस्या यामुळे दूर होऊ शकते.

कुलकर्णी दांपत्याचा वैद्यकीय उपकरणे निर्मितीमधील अनुभव यावेळी कामी आला आहे. त्यांनी मशिनच्या इंजिनयिरिंगची बाजू तयार केली मात्र व्हेंटिलेटर बनवताना आवश्‍यक असलेली मेडिकलची बाजू सांगलीतील शल्यचिकीत्सक डॉ. संजय कुलकर्णी, भूलतज्ज्ञ डॉ. गणेश लिमये यांनी सांभाळली. रुग्णाला व्हेंटिलेटर लावताना हवा, ऑक्‍सिजन यांचे मिश्रण किती असावे, हवेचा दाब किती असावा अशा अनेक बाबी या डॉक्‍टरांनी सांगितल्या आणि त्या पद्धतीने मशिनमध्ये सोय करुन घेतली. त्यामुळे हे मशीन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तोडीचे असल्याचा दावा डॉ. लिमये यांनी केला.

कोरोनाबाधित रुग्ण असल्यास श्‍वसनातील चढ-उतार लक्षात घेऊन, हवेचा दाब, वेग आणि हवा आत सोडून बाहेर काढण्याची फ्रिक्‍वेन्सी शिवाय रुग्णाचीऑक्‍सिजनची आवश्‍यकता हे रुग्णाला आवश्‍यक त्या पध्दतीने स्वयंचलितपणे देण्याचे तंत्रज्ञान या मशिनमध्ये वापरले आहे, हे व्हेंटिलेटर सध्याची गरज पाहून युध्दपातळीवर तयार केले आहे. त्याला अद्याप शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मान्यता मिळालेली नाही. अधिकृत मान्यता मिळाल्यानंतर दिवसात 5 ते 10 युनिट तयार करण्याची क्षमता आहे. देश कोविड-19 सारख्या रोगाशी लढा देत आहे. अशावेळी आपणही मागे न राहता या लढ्यात आपल्या ज्ञानाच्या साहाय्याने सहभागी झाले पाहिजे असा मनाशी दृढ निश्‍चय करुन प्रसाद आणि आदिती कुलकर्णी यांनी भारताला स्वस्तात उपलब्ध होईल असे व्हेंटिलेटर बनवले आहे.

संबंधित बातम्या :