सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरातील लाईट बंद करुन दिवा लावण्याच्या आवाहनाला पाठिंबा म्हणून सोलापुरात काही अतिउत्साही तरुणांनी फटाके फोडले. या फटाक्यांच्या ठिणग्या विमानतळ परिसरात पडल्याने रविवारी (5 एप्रिल) रात्री मोठी आग लागली. अग्निशमन दलाने मोठ्या प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु दिवा लावण्याऐवजी फटाके फोडण्याचा अतिउत्साह मात्र इथे पाहायला मिळाला.


कोरोना व्हायरसविरोधातील लढ्यासाठी एकजूट दाखवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता घरातील लाईट बंद करुन घरात, अंगणात, गॅलरीमध्ये किंवा रस्त्यावर दिवे, मेणबत्ती, मोबाईल टॉर्च लावण्याचं आवाहन केलं. या आवाहनाला नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मात्र याचवेळी काही जणांनी अतिउत्साह दाखवत, मशाली पेटवल्या रस्त्यावर रॅली काढले, फटाके फोडले. असाच प्रकार सोलापुरात घडला.


देश दिव्यांनी उजळला, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद


मागील काही वर्षांपासून बंद असलेल्या सोलापूर विमानतळाच्या परिसरात काल रात्री मोठी लागल्याचं चित्र पाहायला मिळालं. सोलापूर विमानतळाजवळच्या परिसरातील काही अतिउत्साही तरुणांनी फटाके फोडले. याच फटाक्यांच्या ठिणग्या विमानतळ परिसरात पडल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. विमानतळ बंद असल्याने परिसरात मोठ्याप्रमाणात वाळलेले गवत आहे. त्यामुळे लागलीच ही आग पसरत गेली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. काही वेळच्या आटोकाट प्रयत्नानंतर ही आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलं.


दरम्यान, सोलापूर विमानतळ परिसरात आग लागण्याच्या घटना नेहमीच्याच झाल्या असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे. मागील दोन महिन्यांपूर्वी देखील अशाच पद्धतीने मोठी आग लागली होती.


9PM 9 Minutes | राजधानी दिल्लीतूनही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद, नियम मोडत फटाकेही वाजवले