डेल नॉर्टे (फिलिपिन्स) : लॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्या एका 63 वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी गोळ्या घालून ठार केल्याची घटना फिलिपिन्समध्ये घडली आहे. पोलिसांनी या व्यक्तीला चेकपॉईंटवर रोखल्यानंतर त्याने धमकी दिली तसंच पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला देखील केला. परिणामी पोलिसांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्याने त्याचा मृत्यू झाला.


कोरोना व्हायरसच्या विळख्यात सापडलेल्या फिलिपिन्सने देशात लॉकडाऊन केला आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने कठोर अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. लॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्याला गोळ्या घाला, असा आदेश फिलिपिन्सचे राष्ट्रपती रॉड्रिगो डुटेर्ट यांनी सैन्य आणि पोलिसांना दिला आहे.


मद्यधुंद अवस्थेत असलेला हा आरोपी लॉकडाऊन दरम्यान हातात विळा घेऊन खुलेआम फिरत होता. अगुसानच्या डेल नॉर्टे प्रांतातील नासीपिट शहरात एका चेकपॉईंटवर रोखलं असता तो शिवीगाळ करु लागला. मास्क न घातल्याने तिथल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्याला विचारणा केली असता, त्याने रागाने कर्मचाऱ्यावर हल्ला केला. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला.


Coronavirus | कोरोनामुळे अर्थव्यवस्था कोलमडली, जर्मनीत अर्थमंत्र्याची आत्महत्या


फिलिपिन्समध्ये लॉकडाऊनच्या कठोर अंमलबजावणीनंतरचं हे पहिलं प्रकरण आहे, ज्यात उल्लंघन करणाऱ्यावर पोलिसांनी गोळीबार केला. काही दिवसांपूर्वीच फिलिपिन्सचे राष्ट्रपती रॉड्रिगो डुटेर्टे यांनी घोषणा केली होती की, ते सैन्य आणि पोलिसांना अधिकार देत आहेत की, लॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांना गोळ्या घाला.


कोरोना व्हायरसमुळे फिलिपिन्समधील परिस्थिती दिवसेंदिवस भयावह होत चालली आहे. आतापर्यंत तीन हजारांपेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाली असून 150 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत लॉकडाऊन हा एकमेव पर्याय आहे, जेणेकरुन कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखत होईल. त्यामुळे राष्ट्रपती रॉड्रिगो डुटेर्ट यांनी जनतेला लॉकडाऊनचं गांभीर्याने पालन करण्याचं आवाहन केलं आहे. सोबतच जर कोणी लॉकडाऊनचं उल्लंघन केलं आणि त्यामुळे जीवाला धोका उद्भवला तर सैन्य आणि पोलीस गोळी झाडण्यास स्वतंत्र आहेत असा आदेश दिला. त्यात लॉकडाऊनच्या काळात एखाद्याला गोळी झाडण्याची हे पहिलंच प्रकरण समोर आलं आहे.


अमेरिकेकडून हायड्रोक्सीक्लोरोक्वीनची मागणी, भारत पुरवणार औषध


फिलिपिन्समध्ये 16 मार्चपासून लॉकडाऊन आहे. नागरिकांना घरातच राहण्याची तंबी दिली आहे. केवळ दूध, भाजी, किराणा किंवा औषधं यांसारख्या अत्यावश्यक वस्तू घेण्यासाठीच लोक घराबाहेर पडू शकतात. तसंच अत्यावश्यक यंत्रणेतील कर्मचाऱ्याना घराबाहेर पडण्याची परवानगी आहे.


कोरोना व्हायरसमुळे जगभरातील परिस्थितीही बिघडली आहे. जवळपास 13 लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली असून आतापर्यंत 70 लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.