(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mahavikas Aghadi: ...तर बैठका आणि चर्चेतून 'वंचित'ला दूर का ठेवले? जवाब दो! महाविकास आघाडीसोबतच्या जागावाटप तिढ्यावर वंचितची हटके बॅनरबाजी
महाविकास आघाडीतील जागा वाटपाच्या तिढ्यावरुन अकोल्यात हटके बॅनरबाजी करत महाविकास आघाडीला अनेक प्रश्न विचारण्यात आले आहे. शहरभर लावण्यात आलेल्या या बॅनरमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला उधाण आलंय.
Akola News : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा (Maharashtra Maha Vikas Aghadi Seat Sharing)अद्याप सुटला नसून वंचितला किती जागा द्यायच्या यावरून घोडं अडल्याची चर्चा आहे. शिवाय वंचितला किती जागा द्यायचा, यावरुनही महाविकास आघाडीमध्ये दोन गट पडल्याचे दिसून येत आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) मध्ये अपमानास्पद वागणूक देण्यात येत असल्याचे देखील वंचितच्या नेत्यांनी बोलून दाखवले आहे. असे असतांना आता या जागा वाटपाच्या तिढ्यावरुन अकोल्यात (Akola News) हटके बॅनरबाजी करत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे.
... तर बैठका आणि चर्चेतून 'वंचित'ला दूर का ठेवले? जवाब दो!
अकोलेकरांच्या नावाने महाविकास आघाडीला सवाल करणारे अनेक बॅनर शहरभर लावण्यात आल्याने राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला उधाण आले आहे. महाविकास आघाडी जर वंचित बहुजन आघाडीसोबत आहे, तर 2 फेब्रुवारीपासून 27 फेब्रुवारीपर्यंत अंतर्गत बैठका आणि चर्चेतून 'वंचित'ला दूर का ठेवले? 30 जानेवारीच्या बैठकीत वंचितच्या प्रतिनिधीला बैठकीचे बाहेर का बसवले?, महाविकास आघाडी जर प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आहे, तर अकोल्यातून प्रकाश आंबेडकर यांना आपले उमेदवार म्हणून घोषित का करत नाही? असे अनेक प्रश्न या बॅनरच्या माध्यमातून मविआला विचारल्या गेले आहेत.
शहरातील नेहरू पार्क, अशोकवाटीका, कृषीनगर, पंचायत समिती, जिल्हा परिषद अशा अनेक ठिकाणी या आशयाचे बॅनर लावण्यात आले आहे. मात्र, बॅनर लावणारे कोण?, तसेच हे बॅनर कोणाच्या आदेशावरून लावण्यात आले, या बाबत अद्याप कुठलीही माहिती पुढे आलेली नाही. मात्र या हटके बॅनरबाजीची सर्वत्र चर्चा रंगतांना दिसत आहे.
नेमका बॅनरबाजीतील आशय काय ?
- 30 जानेवारीच्या महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिनिधीला बाहेर बसवले.
- 2 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारीपर्यंत वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीच्या सर्व बैठका आणि चर्चेपासून दूर ठेवले गेले.
- वंचित बहुजन आघाडीला जाणीवपूर्वक हरणाऱ्या 2 जागा दिल्या. ज्या मविआमधील कोणत्याच पक्षाने गेल्या 10-15 वर्षांपासून स्वतः कधीच जिंकलेल्या नाहीत.
- महाविकास आघाडी अॅड. प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीला योग्य मान सन्मान का देत नाही ?
- अकोलाकरांचा सवाल..महाविकास आघाडी जर प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आहे, तर अकोल्यातून प्रकाश आंबेडकर यांना आपले उमेदवार म्हणून घोषित का करत नाही? जवाब दो !
इतर महत्वाच्या बातम्या