उत्तर प्रदेशातून भाजपला सत्तेतून हटवणं हे येऱ्या-गबाळ्याचं काम नाही; रामदास आठवलेंचा अखिलेश यादवांना टोला
प्रकाश आंबेडकरांशिवाय रिपाई ऐक्याला काही अर्थ नसून त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार असल्याचं केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले.
मुंबई : उत्तर प्रदेशमध्ये अनेक नेते भाजप सोडून समाजवादी पक्षात चालले आहेत. पण अखिलेश यादवांनी कितीही प्रचार केला तरी भाजपच निवडणूक जिंकणार, उत्तर प्रदेशमध्ये भाजपला सत्तेतून बाहेर हटवणे हे काही येऱ्या-गबाळ्याचं काम नाही असा टोला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी अखिलेश यादव यांना लगावला.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले की, "उत्तर प्रदेशात भाजपमधून जे नेते बाहेर चालले आहेत, त्यामुळे भाजपला फटका बसेल असं अजिबात वाटत नाही. उलट जे भाजप सोडून जात आहेत त्यांचेच नुकसान होईल. भाजपला काही फरक पडणार नाही. भाजप 300 जागा जिंकणार. विरोधकांसह अखिलेश यादव यांनी कितीही प्रचार केला तरी भाजपला हरवणे हे काही येऱ्या-गबाळ्याचे काम नाही."
रामदास आठवले हे कल्याण जवळच्या गोवेली येथील जीवनदीप कॉलेजमध्ये प्राचार्य धनाजी गुरव यांच्या शोकसभेसाठी आले होते. या कार्यक्रमात भाजप आमदार किसन कथोरे, कॉलेज संचालक रविंद्र घोडविंदे आणि रिपाईचे पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना आठवले त्यांनी अखिलेश यादव यांना टोला लागावला. तसेच अन्य राजकीय मुद्यावर मत मांडले.
प्रकाश आंबडेकरांशिवाय रिपाई ऐक्याला अर्थ नाही
मतं खाण्याच्या राजकारणापेक्षा मत घेऊन निवडून येण्याचं राजकारण करण्याबाबत प्रकाश आंबेडकरांनी विचार करावा असा सल्लाही रामदास आठवले यांनी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांना दिला आहे. रामदास आठवले म्हणाले की, "काही दिवसापूर्वी रिपाई नेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी प्रकाश आंबडेकर यांना वगळून रिपाईचे ऐक्य करीत असल्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर बोलताना रामदास आठवले म्हणाले की, जोगेंद्र कवाडे हे आमचे ज्येष्ठ नेते आहे. ऐक्याची भूमिका चांगली आहे. ऐक्य व्हावे या मागणीला पाठिंबा आहे. प्रकाश आंबडेकर यांच्याशिवाय ऐक्य व्हावे या मागणीशी मी सहमत नाही. त्यांना डावलून ऐक्य करण्यात काही अर्थ नाही अस माझं मत आहे. प्रकाश आंबेडकराना ऐक्याचा अध्यक्ष केल्यास त्यांच्या अध्यक्षतेखाली काम करण्याची माझी तयारी आहे. वंचित बहुजन आघाडीने चांगली मतं घेतली. मात्र मतं खाण्याच्या राजकारणामुळे समाजाचा फायदा होणार नाही. त्यासाठी निवडून येत सत्ता मिळवणं आवश्यक आहे."
मतं खाण्याच्या प्रकाश आंबेडकरांच्या राजकारणाला माझा विरोध आहे. मतं खाण्याच्या राजकारणापेक्षा मत घेऊन निवडून येण्याचं राजकारण करण्याबाबत प्रकाश आंबेडकरांनी विचार करणं आवश्यक असल्याचा सल्ला आठवले यांनी दिला.
महत्त्वाच्या बातम्या :