(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी, शेतकऱ्यांची चिंता वाढली
राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतीचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपीटही झाली. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी गारपीटही झाली आहे. या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. सोलापूरसह मराठवाड्यातील काही भागात रात्री अवकाळी पाऊस झालाय. त्यामुळं ज्वारी, हरभऱ्याच्या पिकाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.
तर नाशिकच्या नांदगावमध्येही अवकाळी पावसानं हजेरी लावली. काही भागात गारपीठही झालीय. त्यामुळं उघड्यावर असलेला कांदा भिजल्यानं शेतकऱ्यांना नुकसानाचा सामना करावा लागणार आहे. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालूक्यातील पूर्व भागातील काही गावांमध्ये काल संध्याकाळी गारपीट आणि अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक झालेल्या पावसाने डॉक्टरवाडी, जळगाव-बुद्रुक, पोखरीसह काही गावांमध्ये गारपीट आणि जोरदार पावसाने शेतातील उभे गहू, हरभऱ्याची पिकं आडवी पडली. उन्हाळी कांद्यालाही गारपीटीच्या तडाखा बसला आहे. दरम्यान पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची विनंती शेतकऱ्यांनी पालकमंत्री, आमदारांकडे केली आहे.
पुणे शहरातही ढगाळ वातावरण झालं होतं. काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरीही कोसळल्या. लातूरमध्ये काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून निटूर परिसरात पहाटे पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. थोडा वेळ आलेल्या पावसाने वातावरणात गारवा वाढला आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात आज (1 मार्च) विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर व मराठवाड्यातील बीड, परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांच्या काही भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याशिवाय विदर्भात तुरळक ठिकाणी आज गारपीट होईल, असा इशारा देण्यात आलाय. गोव्यातही अवकाळी पावसाची हजेरी#BreakingNews सोलापूर शहरासह जिल्ह्यातील काही भागात पाऊस, रात्रीपासून अवकाळी पावसाची हजेरी, ज्वारीच्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यताhttps://t.co/IMhJKqvmcZ pic.twitter.com/1CJlm0b2DL
— ABP माझा (@abpmajhatv) March 1, 2020
उत्तर आणि दक्षिण गोव्यात शनिवारी दुपारपासून अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. शनिवारी सकाळपासून वातावरणातील उकडा वाढला होता. दक्षिण गोव्यातील केपे आणि काणकोण तालुक्यात पावसाला सुरुवात झाली, त्यानंतर सांगे, शेळपे, मळकर्णे, साळावली, केवोणा, जांबावली, रिवण, दाभाळ, कुळे, किर्लपाल इत्यादी भागात पावसाला सुरुवात झाली. सत्तरी, डिचोली, फोंडा, धारबांदोडा, सांगे आणि केपे तालुक्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला. अचानकपणे लागलेल्या मुसळधार पावसामुळे लोकांची चांगलीच धांदल उडाली. सत्तरी तालुक्यातील मोर्ले, पर्ये व केरी भागातील काही परिसरात मुसळधार पाऊस पडला. संध्याकाळी 6 च्या सुमारास अर्धा तास जोरदार पाऊस पडला.
उत्तर आणि दक्षिण गोव्यात शनिवारी दुपारपासून अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या, दक्षिण गोव्यातील केपे आणि काणकोण त्यानंतर सांगे, शेळपे,मळकर्णे,साळावली, केवोणा, जांबावली, रीवण, दाभाळ, कुळे, किर्लपाल भागात पाऊसhttps://t.co/IMhJKqvmcZ pic.twitter.com/vXn6yWTMKO
— ABP माझा (@abpmajhatv) March 1, 2020