केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांना कोरोनाची लागण
गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील अनेक बड्या नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. अशातच आता अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ सुनील तटकरे आणि रामदास आठवले यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
मुंबई : केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच राष्ट्रवादी खासदार सुनील तटकरे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील अनेक मोठ्या नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. आधी अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच सुनील तटकरे आणि रामदास आठवले यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे.
रामदास आठवले कोरोना पॉझिटिव्ह
सोमवारी अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या अभिनेत्री पायल घोषणने रामदास आठवले यांच्या उपस्थितीत रिपाइंमध्ये प्रवेश केला होता. या कार्यक्रमाला रामदास आठवले उपस्थित होते. त्यावेळी ते अनेकांच्या संपर्कात आले होते. रामदास आठवले यांना काल कोरोना चाचणी केली होती. आज सकाळी त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल समोर आला आहे. त्यांना मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येणार आहे. आठवलेंना काही सौम्य लक्षणं आहेत, असं त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे. तसेच रामदास आठवलेंच्या संपर्कातआलेल्यांनी स्वतःची कोरोना चाचणी करुन घ्यावी असंही त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.
सुनील तटकरे यांनाही कोरोनाची लागण
राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यासंदर्भात त्यांनी स्वत: ट्वीट करत माहिती दिली. तसेच माझी प्रकृती उत्तम असून खबरदारीचा उपाय म्हणून मी मुंबईतील इस्पितळात दाखल झालो असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. सर्वांच्या आशीर्वादानं लवकरच सेवेत रुजू होईन असं तटकरेंनी ट्वीट करत सांगितलं आहे. दरम्यान आतापर्यंत अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
सुनील तटकरे यांनी ट्वीट केलं की, 'काल माझी करोना चाचणी करण्यात आली असून, आज त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी प्रकृती उत्तम असून खबरदारीचा उपाय म्हणून मी मुंबईतील इस्पितळात दाखल झालो आहे. आपल्या सर्वांच्या सदिच्छा व आशीर्वाद यांच्या बळावर मी लवकरात लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईन.'
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यासंदर्भात अजित पवारांनी ट्वीट करुन माहिती दिली होती. तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यासंदर्भात त्यांनी स्वत: ट्वीट करत माहिती दिली होती. देवेंद्र फडणवीस उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :