एक्स्प्लोर
Advertisement
फरार आरोपीची बीबीए, एमबीए, हॉटेल मॅनेजमेंट करुन बँकेत नोकरी
अमर भोयर नावाच्या आरोपीने फरारी असलेल्या पाच वर्षांच्या कालावधीत चक्क बीबीए, एमबीए आणि हॉटेल मॅनेजमेंटचे अभ्यासक्रम पूर्ण केले. शिक्षण करुन बँकेत नोकरीही मिळवली. या कालावधीत त्याने फोन न वापरल्यामुळे तो कधीच पोलिसांच्या हाती लागला नाही.
नागपूर : फरार झालेला एखादा आरोपी पोलिसांपासून लपण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या करतो. मात्र, नागपुरातील एका हायप्रोफाईल हत्या प्रकरणात पाच वर्षांनंतर पोलिसांच्या हाती लागलेल्या अमर भोयर नावाच्या आरोपीने फरारी असलेल्या पाच वर्षांच्या कालावधीत चक्क बीबीए, एमबीए आणि हॉटेल मॅनेजमेंटचे अभ्यासक्रम पूर्ण केले. शिक्षण करुन बँकेत नोकरीही मिळवली. या कालावधीत त्याने फोन न वापरल्यामुळे तो कधीच पोलिसांच्या हाती लागला नाही.
नागपूरच्या शंकरनगर चौकात 24 ऑगस्ट 2013 रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास भारतीय जनता युवा मोर्चाचा तत्कालीन शहर उपाध्यक्ष हेमंत दियेवारची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. घटनेच्या काही दिवसांनंतर पोलिसांनी हेमंत दियेवारच्या हत्या प्रकरणात शेखू नावाचा गुंड आणि त्याच्या चार सहकाऱ्यांना अटक केली. मात्र, अमर भोयर नावाचा एक आरोपी तेव्हापासूनच फरार होता.
हळूहळू नागपूरकरही दियेवार हत्या प्रकरणाला विसरून गेले. पोलीसही इतर प्रकरणात व्यस्त झाले आणि अमर भोयर नागपूर पोलिसांपासून लांब राहून चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात लपून छपून जगत होता.
नुकतंच नागपुरात पोलीस आयुक्त म्हणून रुजू झालेल्या डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी अनेक वर्षांपासून फरार असलेल्या आरोपींचा कसून शोध घेण्याचे निर्देश पोलिसांना दिले आणि नागपूर पोलिसांनी विस्मरणात गेलेल्या या आरोपीचा शोध सुरु केला. गोपनीय माहितीच्या आधारे यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथून अमर भोयरला अटक करण्यात आली.
अटकेनंतर चौकशीदरम्यान जेव्हा पोलिसांनी अमर भोयरला त्याच्या पाच वर्षांच्या फरारीचा ठावठिकाणा विचारला, तेव्हा त्याच्या उत्तराने पोलीसही चक्रावून गेले. कारण, या पाच वर्षात अमरने शिक्षणात स्वतःला झोकून दिलं. सर्वात आधी त्याने हत्या प्रकरणातील सहभागामुळे त्याचे अर्धवट राहिलेले ग्रॅज्युएशन पूर्ण केले. त्यानंतर चंद्रपुरात एका खाजगी महाविद्यालयातून त्याने चक्क एमबीएची पदव्युत्तर डिग्री ही मिळवली.
त्याशिवाय हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्सही केला. आपल्या शिक्षणाच्या जोरावर त्याने यवतमाळमध्ये एका बँकेत चांगल्या पदावर नोकरीही सुरु केली होती. मात्र, अचानक मध्यरात्री पोलीस त्याच्या ठिकाण्यावर पोहोचले आणि अमरला अटक झाली. या पाच वर्षांच्या काळात त्याने मोजक्याच वेळी मोबाईल फोनचा वापर केला. त्यामुळे पोलिसांना त्याला शोधणं अत्यंत कठीण होऊन बसलं होतं.
मुळात 2011-12 मध्ये अमर यवतमाळमधून नागपुरात शिक्षणासाठीच आला होता. मात्र, विद्यार्थी दशेत त्याची मैत्री नागपुरात चुकीच्या लोकांसोबत झाली आणि त्यांच्यासोबतच तो हेमंत दियेवार हत्या प्रकरणात सहभागी झाला. मात्र, फरार असलेल्या काळात पोलिसांपासून पळताना कदाचित त्याला आपण चुकलो याची प्रचिती झाली... आणि त्याने शिक्षणाच्या मार्गाने पुन्हा आपला जीवन रुळावर आणण्याचा प्रयत्न केला... मात्र, "कानून के हाथ लंबे होते है" हे दाखवत पोलिसांनी त्याला अखेर जेरबंद केलं...
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
राजकारण
क्रिकेट
Advertisement