(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Uddhav Thackeray : शिंदेंनी, नार्वेकरांनी जनतेत यावं आणि विचारावं शिवसेना कुणाची, मग जनतेनं ठरवावं कुणाला तोडावा; उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray Maha Patrakar Parishad : शिंदे गटाला जर न्याय दिला असं वाटत नसेल तर त्यांनी अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव आणावा, मी पाठिंबा देतो असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मुंबई : गेल्या आठवड्यात लबाडाने नव्हे तर लवादाने एक निर्णय दिला, पण शिंदे आणि नार्वेकरांनी लोकांमध्ये यावं, मीही येतो, आणि त्यांना विचारावं की शिवसेना कुणाची? मग लोकांनी ठरवावं कुणाला तोडावं, लाथाडावं आणि कुणाला निवडावं असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर सडकून टीका केली.
ही लढाई आता केवळ शिवसेनेची राहिली नाही तर ही सर्व देशाची लढाई आहे, लोकशाही जिवंत राहणार की नाही, सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार अस्तित्वात राहिल की नाही याची लढाई असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे म्हणाले की, फाशीचा निर्णय हा न्यायालय सुनावतं, पण त्याची अंमलबजावणी ही जल्लादाकडे दिली जाते. या कटाच्या अंमलबजावणी ही नार्वेकर नावाच्या जल्लादाकडे दिली होती. निवडणूक आयोग म्हणजे तर दिव्यच आहे. ज्या महाराष्ट्रात रामशास्त्री प्रभुणे जन्माला आले, संविधान लिहिलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला, त्याच महाराष्ट्रातून विरोधी पक्षांना संपवण्याचं काम यांनी सुरू केलं. जेपी नड्डा यांनी या आधी देशात फक्त भाजप हा एकच पक्ष राहणार असं सांगितलं होतं.
जर 1999 नंतर शिवेसनेची घटनाच अस्तित्वात नव्हती तर 2014 साली मला कशाला मोदींना पाठिंबा द्यायला पाठवलं होतं? 2019 साली कशाला सहीसाठी बोलावलं होतं? तिकडेच ढोकळ्यावाल्याची सही घ्याची होती ना असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
मिधे-फिंद्यांना कुणी पदं दिली, माझं मत हे अवैध असेल तर अमित शाह कशाला मातोश्रीवर आलेले असाही उद्धव ठाकरे यांनी प्रश्न विचारला. शिंदे म्हणाले की उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांना घरगड्यासारखे वागवतात. मग असा कोणता घरगडी आहे जो हेलिकॉप्टरने शेती करायला जातो असा प्रश्नही त्यांनी विचारला.