बड्या नेत्याच्या हत्येच्या कटात काँग्रेस नगरसेवक पोलिसांच्या ताब्यात
भिवंडी शहरातील समदनगर परिसरातील एका बड्या राजकीय नेत्याची हत्या करण्याच्या उद्देशाने आलेल्या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन पिस्तूल आणि 15 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहेत.
ठाणे : भिवंडी शहरातील समदनगर परिसरातील एका बड्या राजकीय नेत्याची हत्या करण्याच्या उद्देशाने आलेल्या दोघांना अटक करण्यात आली आहे. मोहमद साजिद निसार अंसारी आणि दानिश मो. फारुख अंसारी अशी या दोन शार्प शूटर्सची नावे आहेत. त्यांच्याकडून दोन पिस्तूल आणि 15 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहेत. सापळा रचून स्थानिकांच्या मदतीने शहर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
दोन्ही आरोपींना 30 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींची चौकशी केल्यानंतर कॉंग्रेसचे माजी उपमहापौर आणि विद्यमान नगरसेवक अहमद हुसेन सिद्दिकी, माजी नगरसेवक अलीम उद्दीन बक्कन सिद्दिकी व त्यांचा साथीदार असपक सिद्दीकी यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. या संपूर्ण प्रकारामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांनी सोमवारी या तिघांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे. भिवंडी पोलिसांनी ठाणे पोलिसांच्या मदतीने पहाटेपासूनच धाडसत्र सुरु केले होते. या तिघांच्या घरांमधून काही वस्तू जप्त केल्याची माहिती पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी दिली.
दोघे शार्प शूटर कोणत्या राजकीय नेत्यांची हत्या करण्यासाठी आले की वैयक्तिक कारणातून कोणाच्या हत्येचा कट रचला ? हे चौकशीनंतर समोर येईल.