Video | तुकाराम मुंढे म्हणतात, 'विश्वास ठेवा हे सरकारी रुग्णालयच आहे'
सहसा पंचतारांकित हॉटेलांचा जो अंदाज पाहायला मिळतो, अगदी तसंच काहीसं या व्हिडिओच्या सुरुवातीलाच पाहायला मिळत आहे. परिणामी यावर अनेकांचा विश्वासही बसत नाहीये....

गडचिरोली : सहसा सरकारी रुग्णालय म्हटलं की अनेकजण नाकं मुरडतात. मुळात यामागे तशी कारणंही असतात. रुग्णालयांची दूरवस्था पाहूनच तिथं जाण्याचं कित्येकांचं धाडसही होत नाही. पण, अनेक ठिकाणी पर्यायांच्या अनुपलब्धतेमुळं याच सरकारी रुग्णालयांची पायरी चढावी लागते. पुढं खरा संघर्ष सुरु होतो. वॉर्ड नाही, वॉर्ड आहे तर सुविधा नाही, सुविधा आहे तर ती रुग्णापर्यंत पोहोचण्याचे मार्ग नाहीत. सगळाच मनस्ताप!
सरकारी रुग्णालयांची प्रतिमा नेमकी कशी असते यालाच शह देणारा एक व्हिडीओ तुकाराम मुंढे यांनी ट्विटरद्वारे शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यावर प्रथमत: तुमचा विश्वासही बसणार नाही. म्हणूनच की काय मुंढेंनी सोबत एक कॅप्शनही लिहिलं आहे. अवघ्या काही मिनिटांच्या या व्हिडीओची सुरुवात कधी होते आणि तो संपतो कधी हे कळण्याआधीच एक आश्चर्याचा धक्काही पाहण्याऱ्यांना बसतो.
विश्वास ठेवा, हे गडचिरोलीतील सरकारी रुग्णालय आहे. खरंच प्रोत्साहनपर काम इथं करण्यात आलं आहे, असं लिहित मुंढेंनी हा व्हिडीओ सर्वांच्या भेटीला आणला आहे. प्रथमदर्शनी पाहताना आपण एखाद्या पंचतारांकित रुग्णालयाचा व्हिडीओ पाहत आहोत का असाच भास होतो. पण, पुढं कक्षांची नावं पाहिल्यानंतर हे रुग्णालय असल्याचं स्पष्ट होतं.
प्रशस्त, सुसज्ज, अद्ययावत आणि सेवेत तत्पर अशाच शब्दांत या गडचिरोली रुग्णालयाचं वर्ण केलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. दीपक सिंगला यांच्या प्रयत्नांतून साकारण्यात आलेल्या या रुग्णालयासाठी मुंढेंनी त्यांच्या पाठीवर शाबासकीची थापही दिली आहे. मुख्य म्हणजे रुग्णालयाच्या उपलब्धतेमुळं आता अशक्य असणाऱ्या सेवाही अनेक गरजवंतांना मिळू शकणार आहेत.
Believe it, it’s Government Hospital, Gadchiroli. Inspirational work ! Great work@DeepakSingla161, to transform District Hospital , Gadchiroli. Team Gadchiroli ???? pic.twitter.com/3tsiM3Vexa
— Tukaram Mundhe (@Tukaram_IndIAS) February 8, 2021
नक्षलवाद, आदिवासी भाग अशी ओळख असणाऱ्या गडचिरोलीमध्ये अनेकदा काही अत्यावश्यक सोयीसुविधांची कमतरता असल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळतं. आरोग्यसेवा हा त्यातीचल एक भाग. पण, आता या जिल्हा रुग्णालयामुळं या भागातील नागरिकांना खऱ्या अर्थानं एक आशेचा किरणच दिसला आहे, असं म्हणायला हरकत नाही.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

