एक्स्प्लोर
वादळी वाऱ्यामुळे घरावर झाड कोसळले, बुलडाण्यात आईसह दोन चिमुरड्यांचा दुर्देवी मृत्यू
पोलिस आणि नागरिकांनी क्रेनच्या साहाय्याने झाड उचलल्यानंतर तिघांनाही बाहेर काढण्यात आले. नागरिकांनी त्यांना सामान्य रूग्णालयात आणले असता डॉक्टरांनी दोन चिमुकल्यासंह मातेला मृत घोषित केले.

बुलडाणा : मुसळधार पावसासोबत आलेल्या वादळी वाऱ्यामुळे घरावर झाड कोसळल्याची घटना शनिवारी रात्री बुलडाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील घाटपुरीत घडली. यात घरावर पडलेल्या लिंबाच्या झाडामुळे दबून तिघा मायलेकांचा करूण अंत झाला. घरावर कोसळलेले झाड क्रेनच्या साहाय्याने उचलण्यात आल्यानंतर तिन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले. घाटपुरी येथील आनंद नगरातील गुणवंत हिरडकर यांच्या पत्र्याच्या शेड असलेल्या घरावर झाड कोसळले. त्यावेळी घरातील शारदा गुणवंत हिरडकर (28), सृष्टी गुणवंत हिरडकर (3) आणि ऋषिकेश गुणवंत हिरडकर (2) हे तिघे मायलेक दबले गेले. पोलिस आणि नागरिकांनी क्रेनच्या साहाय्याने झाड उचलल्यानंतर तिघांनाही बाहेर काढण्यात आले. नागरिकांनी त्यांना सामान्य रूग्णालयात आणले असता डॉक्टरांनी दोन चिमुकल्यासंह मातेला मृत घोषित केले. या दुर्घटनेची माहिती मिळाताच अनेकांनी घराकडे धाव घेतली. मात्र, तोपर्यंत उशिर झाला होता. घराचा सांगाडा आणि कोसळलेले झाड याच्या खाली गुणवंत हिरडकर यांचे कुटुंब दबले गेले. पोलिसांनी आणि नागरिकांनी घटनास्थळी घाव घेत घरावर पडलेले झाड क्रेनच्या साहाय्याने बाजूला केले. झाडाखाली दबलेले आई, मुलगी आणि मुलाला बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. गुणवंत हिरडकर हे हॉटेल व्यवसायिक असल्याने ते कामावर होते. त्यामुळे त्यांचा जीव वाचला.
आणखी वाचा























