Todays Headline 7th october : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

Todays Headline : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.
धनुष्यबाण चिन्हं कोणाचं, निवडणूक आयोग आज निर्णय देणार?
धनुष्यबाण चिन्हं कोणाचं यावर निवडणूक आयोगाची अंतीम टप्प्यात सुनावणी आली आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेला आपलं म्हणणं मांडण्यासाठी सात ऑक्टोबर पर्यंतची वेळ दिली आहे. त्यामुळे अंधेरी पोटनिवडणुकीआधीच शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निकाल लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या चिन्हासाठी आजचा दिवस महत्वाचा मानला जातोय. निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
मानची मुलगी कॅनडाची कॉन्सुल जनरल म्हणून काम करणार -
15 ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन म्हणून साजरा केला जातो. याप्रसंगी आज मान येथील एक मुलगी अॅथलीट मुंबईत कॅनडाची कॉन्सुल जनरल म्हणून एक दिवस काम करणार आहे. ज्याप्रमाणे एक दिवसाचा मुख्यमंत्री असतो. एक दिवसाचे कॉन्सुल जनरल बनण्यासाठी काही प्रक्रिया असते.
शीना बोरा हत्याकांड सुनावणी -
शीना बोरा हत्याकांड खटल्याची मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. इंद्राणीचा सावत्र मुलगा आणि शीनाचा प्रेमी राहुल मुखर्जीची साक्ष आजही सुरू राहणार. इंद्राणीचे वकील राहुलची उलटतपासणी आजही सुरूच ठेवणार आहेत. गेल्या दोन सुनावणीत राहुलने अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत.
नारायण राणेंची पत्रकार परिषद -
केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे शुक्रवार दिनांक सात ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी तीन वाजता भाजप प्रदेश पक्ष कार्यालय,नरिमन पॉईंट, मुंबई येथे पत्रकार परिषद घेणार आहेत. दसरा मेळ्यात झालेल्या टीकेला नारायण राणे प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे.
भाजपकडून दीडशे पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण -
राज्यात भाजप सरकार आल्यानंतर भाजपकडून आता राज्यातील प्रमुख दीडशे पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. आजपासून रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे तीन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात भाजपचे कोर कमिटीचे सर्व सदस्य, प्रमुख मंत्री आमदार उपस्थित असतील येणाऱ्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने हे प्रशिक्षण आहे.
उपमुख्यमंत्री फडणवीस अकोला दौऱ्यावर -
उपमुख्यमंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आज अकोल्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे. त्यानंतर ते पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.
अमित शाह आज गंगटोकमध्ये एनसीडीएफआयच्या राष्ट्रीय संमेलनाचे उद्घाटन करणार -
सहकार मंत्री अमित शाह आज सिक्किमची राजधानी गंगाटेकमध्ये भारतीय राष्ट्रीय सहकारी डेयरी महासंघाच्या (एनसीडीएफआय) राष्ट्रीय संमेलनाचे उद्घाटन करणार आहेत. आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, सिक्किम, बिहार, पश्चिम बंगाल, मिजोरम, नगालँड, मणिपुर, त्रिपुरा, ओडिशा आणि झारखंड येथील तब्बल 1200 प्रतिनिधी यामध्ये सहभागी होणार आहेत.
जेपी नड्डा आसाम दौऱ्यावर -
भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आज आसामच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांचा हा तीन दिवसांचा दौरा असेल. या दौऱ्यामध्ये आसाम येथील भाजपच्या कार्यलायचे उद्घाटन करणार आहेत. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री अमित शाह उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे.
भारतीय गुणवत्ता परिषद आपला रौप्य महोत्सव साजरा करणार; या सोहळ्याला पियुष गोयल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार
भारतीय गुणवत्ता परिषद आज नवी दिल्लीतील आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र येथे विशेष कार्यक्रमाद्वारे आपला रौप्य महोत्सव साजरा करणार आहे. गुणवत्ता उंचावत भारताने साधलेली प्रगती सामायिक करणे हा यामागचा उद्देश आहे. गुणवत्ता आणि सातत्यामध्ये मूळ असलेल्या भारताच्या उत्कृष्टतेची प्रशंसा करण्यासाठी धोरणनिर्मिती,प्रशासन आणि गुणवत्तेतील दिग्गज एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. माजी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू, जी-20 मधील भारताचे प्रतिनिधी अमिताभ कांत, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाचे सचिव अनुराग जैन, आणि भारतीय व्यापार प्रोत्साहन संघटनेचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक आणि माजी वाणिज्य सचिव बी. व्ही. आर सुब्रह्मण्यम आणि इतर मान्यवर या सोहळ्यात सहभागी होणार आहेत.
वाराणसी आणि ज्ञानवापी प्रकरणाची सुनावणी -
ज्ञानवापी मशीद प्रकरणी आणि वाराणसी येथील प्रकरणावर आज सुनावणी होणार आहे. या सुणावणीकडे देशाचं लक्ष लागलं आहे.
महिला टी20 आशिया कप: भारताचा सामना पाकिस्तानसोबत
महिला टी20 आशिया कपमध्ये आज भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामना होणार आहे. मिताली राजच्या नेतृत्वातील भारतीय संघाच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आशिया चषकामध्ये सात संघाचा सहभाग आहे. 15 ऑक्टोबर रोजी अंतिम सामना होणार आहे.
प्रो कबड्डीच्या नव्या हंगामाचा शुभारंभ -
मुंबई प्रो कबड्डी लीग (पीकेएल) च्या नवव्या हंगामाला आजपासून सुरुवात होणार आहे. कोरोनानंतर दर्शकांना येण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे या सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
