(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Todays Headline 24 th June : आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या
Top News : एबीपी माझा प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
मुंबई : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..
एकनाथ शिंदेंचे पुन्हा एकदा विधानसभा उपाध्यक्षांना पत्र
एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा विधानसभा उपाध्यक्षांना पत्र लिहिलंय. भरत गोगावलेच शिवसेनेचे मुख्य प्रतोद आहेत, असं पत्र एकनाथ शिंदेंनी लिहिलंय. 12 आमदारांना कारवाई करण्याचं पत्र ठाकरे समर्थक शिवसैनिकांनी दिलं होतं. त्यानंतर आता एकनाथ शिंदेंनी पुन्हा पत्र लिहित भरत गोगावलेच आमचे प्रतोद आहेत असं म्हटलंय. त्यामुळे एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे वाद शिगेला पोहोचल्याचं दिसून येतंय.
अनिल परबांची सलग चौथ्या दिवशी ईडीकडून चौकशी
दुसरीकडे परिवहन मंत्री अनिल परबांची सलग चौथ्या दिवशी ईडीकडून चौकशी होणार आहे. परबांना आज ११ वाजता पुन्हा चौकशीला बोलावलंय. दापोलीतील कथित बेकायदेशीर रिसॉर्ट प्रकरणात ईडीकडून अनिल परब यांची चौकशी सुरु आहे.
द्रौपदी मुर्मू आज उमेदवारी अर्ज भरणार
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एनडीएने द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे. मुर्मू आज दुपारी 12.30 वाजता आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे. भाजप संसदीय मंडळाने राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारासाठी 20 नावांवर चर्चा केली. त्यानंतर पूर्व भारतातील आदिवासी महिलेची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. द्रौपदी मुर्मू भाजपच्या उमेदवार आहेत.
अग्निपथ योजनेविरुद्ध संयुक्त किसान मोर्चाचे देशव्यापी आंदोलन
केंद्र सरकारने सैन्य भरतीसाठी घोषीत केलेल्या अग्निपथ योजनेविरुद्ध संयुक्त किसान मोर्चा देशव्यापी आंदोलन करणार आहे.
जुग जुग जियो आज प्रदर्शित होणार
दिग्दर्शक करण जोहरचा जुग जुग जियो हा चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. जुग जुग जियो या चित्रपटामध्ये कियारा आडवाणी, वरुण धवन, अनिल कपूर आणि नितू कपूर हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत. कौटुंबिक नात्यावर भाष्य करणारा हा सिनेमा विनोदी असणार आहे, ट्रेलरवरून याचा अंदाज येतो.
आज शमशेराचा ट्रेलर लॉन्च होणार
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या 'शमशेरा' सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात संजय दत्त आणि वाणी कपूरदेखील (Vaani दिसणार आहे. आज शमशेराचा आज ट्रेलर लॉन्च होणार आहे.