Todays Headline 20th August : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या
Maharashtra News : एबीपी माझा प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत
मुंबई : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..
डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज नऊ वर्ष
डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज नऊ वर्ष पूर्ण होतायत. यानिमित्ताने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या दोन गटांकडून वेगवगेळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलंय. अविनाश पाटील अध्यक्ष असलेल्या गटाकडून सकाळी 7 वाजता डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांची जिथे हत्या करण्यात आली तिथून महात्मा फुले पुतळ्यापर्यंत निर्भया वॉकचे आयोजन करण्यात आलंय.
मुंबई भाजपाकडून कार्यकर्ता मेळावा
मुंबई भाजपाकडून कार्यकर्ता मेळावा आणि शेलार आणि मंगलप्रभात लोढा यांचा सत्कार समारंभ होणार आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करणार आहेत.
आदित्य ठाकरे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर
जळगाव जिल्ह्यातील सेनेचे पाच आमदार शिंदे गटात गेल्या नंतर उद्धव सेनेला मोठा झटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे बंडखोर आमदार किशोर पाटील, गुलाबराव पाटील आणि चिमण आबा पाटील यांच्या मतदार संघात तर जाणार आहेत. सकाळी 11 पासून दौऱ्याची सुरुवात होईल. दुपारी आदित्य ठाकरे धुळ्यात येतील. पारोळा चौफुली येथे आदित्य ठाकरेंचं स्वागत केलं जाणार आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार आजपासून दोन दिवसांच्या अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर
विरोधी पक्षनेते अजित पवार आजपासून दोन दिवसांच्या अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी 8.30 वाजता त्यांचं अमरावतीत आगमन होईल. त्यानंतर ते मेळघाटला रवाना होतील. मेळघाटातील भोकरबर्डी येथील अतिवृष्टीग्रस्त भागाची ते पाहणी करतील. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र कळमखार तालुका धारणी येथे भेट देणार आहे. त्यांनतर उपविभागीय अधिकारी कार्यालय धारणी येथे कुपोषणग्रस्त बालक / बाल मृत्यू / गर्भवती महिला यांच्या संदर्भात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था समवेत चर्चा करणार आहेत.
राजीव गांधी यांची 78 वी जयंती
राजीव गांधी यांच्या 78 व्या जयंतीनिमित्त काँग्रेसकडून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.