20 November: राहुल गांधीच्या पदयात्रेचा महाराष्ट्रातला आज शेवटचा दिवस, फिफा विश्वचषक आजपासून
Todays Headline 20 November: राहुल गांधीच्या पदयात्रेचा महाराष्ट्रातला आज शेवटचा दिवस आहे. सकाळी 6 वाजल्यापासून राहुल गांधी भेंडवळ येथून चालायला सुरूवात करणार आहेत. सकाळी 11 वाजता राहुल गांधी पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.
मुंबई: राहुल गांधीच्या पदयात्रेचा महाराष्ट्रातला आज शेवटचा दिवस आहे. सकाळी 6 वाजल्यापासून राहुल गांधी भेंडवळ येथून चालायला सुरूवात करणार आहेत. सकाळी 11 वाजता राहुल गांधी पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. दुपारी 4 वाजता जळगाव जामोद येथून पुन्हा पदयात्रेला सुरूवात होणार आहे. त्यांचा आजचा मुक्काम सितापूर येथे असणार आहे.
फिफा विश्वचषक आजपासून
फिफा विश्वचषक आजपासून कतारच्या दोहा येथील अल बायत स्टेडियमवर सुरूवात होणार आहे. फुटबॉल विश्वचषक प्रथमच मध्यपूर्वेच्या देशात आयोजित केला गेलाय. विश्वचषक स्पर्धेत एकूण 32 देशांचे संघ सहभागी होत आहेत. स्पर्धेतील पहिला सामना यजमान कतार आणि इक्वेडोर यांच्यात भारतीय वेळेनुसार रात्री 9.30 वाजता सुरूवात होणार आहे. फिफाचा उद्घाटन सोहळा भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता अल बायत स्टेडियममध्ये होणार आहे. कतारमध्ये होणाऱ्या सोहळ्यात भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड सहभागी होणार आहेत.
27 तासांचा मेगाब्लॉक
कर्नाक उड्डाणपूलाच्या पाडकामासाठी मध्य रेल्वेवर शनिवारी रात्री 11 वाजल्यापासून 27 तासांचा मेगाब्लॉक सुरु झाला आहे. यात सीएसएमटी-भायखळा, वडाळादरम्यान लोकल फेऱ्या बंद राहणार आहेत. ब्लॉककाळात दररोज धावणाऱ्या 1 हजार 810 लोकल फेऱ्यांपैकी 1 हजार 96 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. भायखळा, परेल, कुर्ला, दादर या स्थानकांतून ठाणे, कल्याण, तसेच कर्जत-कसारा या स्थानकांदरम्यान लोकल ट्रेन चालवल्या जाणार आहेत. याशिवाय, हार्बर मार्गावर वडाळा ते पनवेल आणि गोरेगाव या स्थानकादरम्यान लोकल धावतील. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बेस्टने 19 नोव्हेंबर रोजी रात्री 10.30 पासून 20 नोव्हेंबर रोजी पहाटे 6.30 पर्यंत 47 जादा बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाक पूलाचं काम सुरू झालेलं असेल.
नौदलाच्या पश्चिम विभागाकडून मुंबईत अर्ध-मॅरॅथॉनचे आयोजन
नौदल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांचा भाग नौदलाच्या पश्चिम विभागाने आज मुंबईत इंडियन ऑईल डब्लूएनसी नेव्हल हाफ मॅरॅथॉन-2022 या शर्यतीचे आयोजन केले आहे. वर्ष 2016 पासून नौदलाच्या पश्चिम विभागाकडून अर्ध- मॅरॅथॉनच्या आयोजनाची सुरुवात झाली. तेव्हापासून या शर्यतीचा आवाका आणि आकारमान वाढतच गेले असून आता ही शर्यत भारतातील पाचव्या क्रमांकाची आणि मुंबईतील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी धावण्याची शर्यत मानली जाते
71 व्या अखिल भारतीय पोलीस रेसलींग क्लस्टर चॅम्पियनशिप स्पर्धेचा समारोप
पुणे – 71 व्या अखिल भारतीय पोलीस रेसलींग क्लस्टर चॅम्पियनशिप स्पर्धेच्या समारोपाला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम संध्याकाळी 4.30 वाजता पार पडेल.
गोव्यामध्ये 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात
गोव्यामध्ये 20 ते 28 नोव्हेंबर 2022 या काळात आयोजित केल्या जाणाऱ्या 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या प्रमुख पैलूंपैकी एक असेल, सुगम्यता अर्थात सहज प्रवेश. महोत्सवाचे आयोजन स्थळ अडथळ्यांपासून मुक्त करण्यासाठीच्या विविध सोयी सुविधांसह इफ्फी मध्ये दिव्यांगजनांसाठी विशेष विभाग असेल, या ठिकाणी महोत्सव आणखी सर्वसमावेशक व्हावा, यासाठी दिव्यांगजन चित्रपट रसिकांसाठी विशेष शैक्षणिक सत्र आयोजित केली जाणार आहेत.
जळगावात संजय सावंत यांचा मेळावा
जळगाव – आगामी निवडणुका लक्षात घेत पक्ष बळकट करण्याचा दृष्टीने उद्धव ठाकरे गटाच्या सेनेच्या वतीने संपर्क मंत्री संजय सावंत यांच्या नेतृत्वात शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या धरणगाव मतदार संघात मेळावा.