Todays Headline 18th July : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या
Maharashtra News : एबीपी माझा प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
आज राष्ट्रपतीपदाची निवडणूक
राष्ट्रपती पदासाठी एनडीएकडून द्रौपदी मुर्मू यांना तर विरोधकांकडून यशवंत सिन्हांना उमेदवारी देण्यात आली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहातील खासदार आणि सगळ्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील विधानसभेतील आमदार राष्ट्रपती पदासाठी मतदान करणार आहेत. प्रेफरन्शियल व्होटिंगद्वारे ही मतदान प्रक्रिया पार पडते. सकाळी10 ते संध्याकाळी 5 या वेळेत संसदभवन आणि राज्यांच्या विधिमंडळात मतदान पार पडेल. शिंदे गट आणि भाजपच्या आमदारांचा मुक्काम काल रात्रीपासून ट्रायडंट हॉटेलमध्ये आहे. गेले दोन दिवस मतदानाबाबत शिंदे गट- भाजपाच्या बैठका सुरु आहेत. राष्ट्रवादीच्या आमदारांची सकाळी 9 वाजता विधान भवनात बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला अजित पवार आणि जयंत पाटील मार्गदर्शन करतील.
संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून
संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होणार असून ते 12 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. सरकारकडून अधिवेशनात 24 नवीन विधेयकं मांडली जाणार आहेत. दोन्ही सभागृहांचं कामकाज सकाळी 11 वाजता सुरु होणार आहे. पंतप्रधान मोदी सकाळी 10 वाजता संसद भवनात दाखल होतील आणि माध्यमांशी संवाद साधतील. अधिवेशनात अग्नीपथ, असंसदीय शब्दांची यादी, संसद परिसरातील आंदोलनांना बंदी या विषयांवरुन विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.
आज जगदीप धनकड उपराष्ट्रपती पदासाठी नामांकन अर्ज भरणार
एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार जगदीप धनकड आज सकाळी 10.30 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. विरोधकांकडून मार्गारेट अल्वा यांना उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे. मार्गारेट अल्वा 19 जुलैला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
आजपासून खाद्यपदार्थ आणि घरगुती वापराच्या वस्तू महागणार
पनीर, दूध, लस्सी असे पदार्थ, स्टेशनरी वस्तू, किराणा माल आदी गोष्टी आजपासून महागणार आहेत. या गोष्टींना जीएसटीतून देण्यात आलेली सूट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. व्यापाऱ्यांनी विविध मार्गांनी या निर्णयाला विरोध केला आहे.
थोड्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाचा इशारा
उत्तर ओडिशा भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने आणि गुजरात ते महाराष्ट्र किनारपट्टी भागात कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाला आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढू शकतो. किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेग देखील अधिक असणार. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आज गोंदिया आणि गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
पंढरपूरमध्ये 40 जणांना विषबाधा
पंढरपूर येथील श्री विठ्ठल आश्रम या ठिकाणी 40 जणांना अन्नातून विषबाधा झाली आहे. या सर्वांवर सध्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे हॉस्पिटल प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या पालखीचा परतीचा प्रवास
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम हा पुरंदर तालुक्यातील वाल्हे या ठिकाणी असणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना नीरा स्नान घातले जाईल. पंढरपूरला जाताना आणि पंढरपूरहून आळंदीच्या दिशेने परतीच्या प्रवासावेळी देखील नीरा स्नान घातले जाते.