Todays Headline 1 June : आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या
National News : एबीपी माझा प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
अयोध्येतील राम मंदिराच्या गाभाऱ्याची पायाभरणी
अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणाला सुरुवात झाली असून आज मंदिराच्या गाभाऱ्याची पायाभरणी होणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते या गाभाऱ्याची पायाभरणी करण्यात येणार असून यावेळी उत्तर प्रदेशमधील मंत्री,
श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यास चे अध्यक्ष नृत्य गोपाल दास यांच्यासह एकूण 250 साधू संत आणि राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत. ही पायाभरणी झाल्यानंतर डिसेंबर 2023 पर्यंत या गाभाऱ्याचं काम पूर्ण होणार आहे. तर जानेवारी 2024 पर्यंत या मंदिराचं बांधकाम पूर्ण होण्याचा अंदाज आहे.
राज ठाकरेंवर आज होणारी शस्त्रक्रिया पुढे ढकलली
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर आज होणारी शस्त्रक्रिया ही पुढे ढकलण्यात आली आहे. राज ठाकरे यांच्या रिपोर्टमध्ये कोविड डेड सेल्स असल्याचं निदान झालं असून त्यामुळे त्यांना अॅनास्थेशिया देणं शक्य नाही. या वैद्यकीय कारणास्तव ही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. राज ठाकरे यांच्या शरीरात कोविड डेड सेल्स असल्याचं आढळलं. या सेल्स डेड असल्याने त्यांना कोरोनाची लागण नाही असं डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे. यामुळे त्यांना अॅनास्थेशिया म्हणजे भूलीचं इंजेक्शन देण्यात येऊ शकणार नाही. त्यामुळेच आता ही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली असून राज ठाकरे आता त्यांच्या घरी परतले आहेत.
गायक केके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
गायक केके (Krishnakumar Kunnath) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. कोलकाता येथील लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांना CMRI रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. वयाच्या 53 व्या वर्षी कोलकात्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. केके यांच्या निधनानंतर बॉलिवूडवर शोककळा पसरली असून अनेकांनी त्यांच्या निधनावर हळहळ व्यक्त केली आहे.
पहिल्या 'शिवाई' इलेक्ट्रिक बसचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते
राज्याची लालपरी म्हणून ओळखली जाणारी एसटी बस आता नव्या रूपात सर्वांसमोर येत आहे. उद्यापासून पहिली इलेक्ट्रिक एसटी बस पुणे ते अहमदनगर मार्गावर धावणार आहे. पहिल्या 'शिवाई' या इलेक्ट्रिक बसचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. 1 जून, 1948 रोजी पुणे-अहमदनगर-पुणे मार्गावर एसटी महामंडळाची पहिली बस धावली होती.
इंद्राणी मुखर्जीच्या याचिकेवर सुनावणी
शीना बोरा हत्येप्रकरणी नुकताच जामीन मिळालेल्या इंद्राणी मुखर्जीनं हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. भायखळा महिला कारागृहातील वॉर्डन मंजुळा शेट्ये मारहाण प्रकरणानंतर कारागृहात कैद्यांनी केलेल्या हिंसक आंदोलनाप्रकरणी इंद्राणी मुखर्जी आणि इतर महिला कैद्यांवर नोंदवलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मुख्य मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.
साकीनाका बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या शिक्षेवर सुनावणी
साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी मोहन चौहानच्या शिक्षेवर आज सुनावणी होणार आहे. मुंबईतील दिंडोशी सत्र न्यायालय आजच निकाल देण्याचा शक्यता आहे. 10 सप्टेंबर 2021 रोजी एका 30 वर्षीय महिलेवर बलात्कारनंतर झालेल्या पाशवी हल्याचं हे प्रकरण आहे. पीडित महिलेचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
सचिन वाझेच्या माफीच्या साक्षीदार अर्जावर सुनावणी
सचिन वाझेनं माफीचा साक्षीदार बनण्यासाठी दाखल केलेल्या अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टात सुनावणी होणार आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या खटल्यात माफीचा साक्षीदार होण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. तपासयंत्रणा यावर आज आपली भूमिका स्पष्ट करणार आहे.
भालचंद्र मुणगेकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन
'माझी संसदेतील भाषणे' या माजी खासदार भालचंद्र मुणगेकर यांच्या पुस्तकाचं प्रकाशन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते आणि खासदार संजय राऊत, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. हा कार्यक्रम संध्याकाली 5 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर या ठिकाणी होणार आहे.