आज-उद्या मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता
दक्षिण कोकणातही सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे काल रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या.
मुंबई : आज आणि उद्या मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. अरबी समुद्रात कर्नाटकजवळ कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
दक्षिण कोकणातही सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे काल रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या. डोंबिवलीतही काही वेळ पाऊस पडला. त्यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या प्रवाशांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली.
याशिवाय बुलडाण्यातही मुसळधार पाऊस झाला आहे. फक्त 15 मिनिटासाठी हा पाऊस झालेला असला तरी लोकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पाऊस थांबला असला तरी परिसरातील ढगाळ वातावरण कायम आहे.
राज्यात अनेक ठिकाणी लोक अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. अरबी समुद्रात कर्नाटकजवळ कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं मध्य महाराष्ट्रासह इतर भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाजामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.