(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur News : पीटी शिक्षकाने दिव्यांग मुलाला उन्हात उभं ठेवलं; पालकांनी जाब विचारल्यावर विद्यार्थ्याचं निलंबन
एका विद्यार्थ्याने खोडी केल्यामुळे सर्व विद्यार्थी हसायला लागले. शिक्षकाला अर्णवनेच खोडी केली असल्याचे वाटले. त्यामुळे तो राग मनात ठेवून शिक्षकाने मेडिटेशन क्लास संपेपर्यंत अर्णवला उन्हात उभे ठेवले.
Nagpur News : नागपूरच्या एका खाजगी शाळेमध्ये मेडिटेशन क्लास दरम्यान पीटी टीचरने एका दिव्यांग मुलाला तासभर उन्हामध्ये उभे ठेवले. विद्यार्थ्याची प्रकृती खालावल्याने आई-वडिलांनी शाळा प्रशासनाला या संदर्भात जाब विचारला. त्यामुळे शाळा प्रशासनाकडून दिव्यांग विद्यार्थी अर्णव राठोडला शाळेतूच निलंबित करण्यात आले.
अर्णव राठोड हा नागपुरातील माऊन्ट लिटेरा शाळेत (Mount Litera Zee School Nagpur) इयत्ता पाचवीत शिकतो. तो 61 टक्के दिव्यांग असून याला जन्मजात सेरेबल पालसी हा आजार आहे. त्यामुळे अर्णवला चालताना नीट तोलही सांभाळता येत नाही. काही वेळानंतर त्याला आसऱ्याची गरज असते. मात्र अशा परिस्थितीतही अर्णव जिद्दीने सामान्य विद्यार्थ्यांसोबत शाळा शिकतो. अर्णवच्या शाळेत बुधवारी पीटीचा (शारीरिक शिक्षण) वर्ग सुरु होता. वर्गानंतर सर्व विद्यार्थी मैदानात बसून मेडिटेशन करत होते. यावेळी अर्णवला जमिनीवर बसवण्यात आले. त्याला खुर्चीची गरज होती. त्याच दरम्यान एका विद्यार्थ्याने खोडी केली. त्यामुळे सर्व विद्यार्थी हसायला लागले. त्यावेळी शिक्षकाला अर्णवनेच खोडी केली असल्याचे वाटले. त्यामुळे तो राग मनात ठेवून शिक्षकाने मेडिटेशन क्लास संपेपर्यंत अर्णवला उन्हात उभे ठेवले.
सुरुवातीला अर्णवच्या आई-वडिलांना याची कल्पनाच नव्हती. गुरुवारी डिहायड्रेशनमुळे त्याची प्रकृती खालवली. अर्णवला मिळालेल्या वागणुकीबद्दल शुक्रवारी दुसऱ्या पालकांकडून अर्णवच्या पालकांना माहिती मिळाली. याचा जाब विचारण्यासाठी अर्णवच्या आई-वडिलांनी शनिवारी माऊन्ट लिटेरा शाळा गाठली. यानंतर शालेय प्रशासनाकडून आई-वडिलांवर गैरवर्तणुकीचा ठपका ठेवत थेट अर्णवलाच शाळेतून निलंबित केले. या घटनेसंदर्भात आणि शालेय प्रशासनासोबत संपर्क साधला असता त्यांनी घटनेची अंतर्गत चौकशी सुरु असून शिक्षक दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले.
अर्णव हा दिव्यांग आहे. त्याला शाळेतून निलंबित केल्याचे कळल्यानंतर तो जबरदस्त मानसिक धक्क्यात असून त्याच्या आई-वडिलांना देखील या घटनेने प्रचंड वेदना झाल्या आहेत. त्यामुळे आपल्या मुलाला न्याय मिळावा यासाठी त्यांनी या संपूर्ण घटनेची पोलीस व गट शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.
इतर पालकांमध्येही रोष
एखाद्या दिव्यांग विद्यार्थ्यासोबत शाळा प्रशासनाची अशी वागणूक योग्य नसून या घटनेसंदर्भात पालकांमध्ये रोष आहे. तसेच शालेय प्रशासनाने माणुसकीच्या दृष्टीने विचार करुन निलंबनाचा निर्णय मागे घ्यावा तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने जगण्यासाठी सहकार्य करावे अशी मागणी इतर विद्यार्थ्यांच्या पालकांकडून होत आहे.