Nagpur Accident : शाळेसमोर मृत्यूचा थरार, स्कूल बसने दहावीच्या विद्यार्थ्याला चिरडले
बसने व्हॅनला धडक दिल्यावर काही दूरपर्यंत व्हॅन खासत गेली. रस्त्याच्या बाजूने 2 मुले पाया जात होती. बसने दोघांनाही धडक दिली. त्यांपैकी एक मुलगा बाजुला फेकला गेला आणि दुसरा मुलगा बसच्या खाली आला.
Nagpur News : नागपूर शहरालगत असलेल्या म्हसाळा या गावात मेरी पाऊसपिन्स शाळेसमोर (Marie Poussepins Academy ICSE School) स्कूल बसने दिलेल्या धडकेत 14 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. तो दहावी इयत्तेत शिकत होता. विद्यार्थ्यांनी आपल्याच शाळेसमोर हा मृत्यूचा थरार उघड्या डोळ्यांनी बघितला. त्यानंतर काही वेळाने त्या विद्यार्थ्याच्या मृत्यूची बातमी धडकताच विद्यार्थी दहशतीत आले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, नित्यनेमाप्रमाणे मंगळवारी (22 नोव्हेंबर) दुपारी शाळा सुटली. या शाळेत जास्तीत जास्त विद्यार्थी स्कूल बस, स्कूल व्हॅनने जाणे येणे करतात. त्यामुळे शाळा सुटल्यावर सर्व विद्यार्थी मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर येत होते. तेवढ्यात शाळेची बस बाहेर आली आणि एका महिलेला आणि पुरुषाला धडक दिली. त्यानंतर चालकाला काही कळलेच नाही. त्याने सरळ बस दामटणे सुरु केले आणि पुढे असलेल्या एका खासगी स्कूल व्हॅनला धडक दिली. काही दूरपर्यंत ती व्हॅन (School Van) बसने घासत नेली. दरम्यान रस्त्याच्या बाजूने दोन मुले पायी जात होती. बसने दोघांनाही धडक दिली. त्यांपैकी एक मुलगा बाजूला फेकला गेला आणि दुसरा मुलगा बसच्या खाली आला.
सम्यक दिनेश कदंबे (वय 14 वर्षे) असे मृत विद्यार्थ्याचे नाव सांगण्यात येते. त्याच्या डोक्यावरुन बसचे चाक गेले, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. हा अपघात होताच एक विद्यार्थी जखमी विद्यार्थ्याकडे धावला आणि त्याला पकडले. त्याच्यापाठोपाठ इतर विद्यार्थी आणि चालकही धावले. लगेच शाळा प्रशासनाचे लोकही तेथे पोहोचले आणि त्याला हॉस्पिटलमध्ये नेले. आधी दोन खासगी रुग्णालयांत नेल्यानंतर अखेरीत त्याला मेयो हॉस्पिटलमध्ये (इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय) नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
'आंखे खोल' म्हटल्यावर त्याने उघडले डोळे
ज्या विद्यार्थ्याने जखमी विद्यार्थ्याला सर्वप्रथम बघितले आणि उचलले, तो त्याच्याच व्हॅनमधील दहावीच्या वर्गातील विद्यार्थी आहे. त्याने सांगितले की सम्यकचा चेहरा रक्ताने माखलेला होता. आम्ही त्याला उचलले, तेव्हा तो हालचाल करत नव्हता. पण मी 'आंखे खोल', असे म्हटल्यावर त्याने डोळे उघडले होते. त्यामुळे त्याला काहीही होणार नाही, याची खात्री होती. पण सायंकाळी त्याच्या मृत्यूची बातमी धडकली. तेव्हा हा विद्यार्थी अतिशय घाबरला होता. आपल्यासोबत व्हॅनमध्ये रोज शाळेत येणारा सम्यक आता आपल्यासोबत नसणार, ही कल्पनाच त्याला सहन झाली नाही.
व्हॅनमध्ये होती दोन मुले..
महिला आणि एका पुरुषाला धडक दिल्यानंतर स्कूल बस ज्या व्हॅनला घासत पुढे घेऊन गेली. (सीसीटीव्ही फुटेजमध्ये तसे स्पष्ट दिसते) त्या व्हॅनमध्ये दोन मुले होती. व्हॅनचालकाने लगेच सावध होत. चालकाच्या विरुद्ध बाजूने जाऊन व्हॅनचे स्टेअरिंग डाव्या बाजूला फिरवले आणि बसच्या तावडीतून व्हॅन बाजूला काढली. त्यानंतर बस पुढे जाऊन विजेच्या खांबाला जाऊन धडकली आणि थांबली. तेव्हा कुठे मृत्यूचा थरार थांबला, असे चालकाने सांगितले.
एसटीचा निवृत्त चालक होता स्कूल बस चालवणारा
ज्या स्कूल बसने विद्यार्थ्याला चिरडले, त्या बसचा चालक एसटी महामंडळाचा निवृत्त चालक असल्याची माहिती आहे. त्याचे वय 70 वर्षांच्या जवळपास असल्याचे सांगण्यात आले. सुरुवातीला महिला आणि पुरुषाला धडक दिल्यानंतर तो घाबरला असावा आणि नंतर त्यांचे बसवरील नियंत्रण सुटले असावे, असा अंदाज व्हॅनच्या चालकाने व्यक्त केला. पोलीस चौकशीत काय ते समोर येईलच. पण काहीही चूक नसताना सम्यकचा जीव गेला आणि त्याच्या मित्रांना दुःखात बुडवून गेला.
ही बातमी देखील वाचा