साताऱ्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत तिघांचा मृत्यू
साताऱ्यातील फलटण-पंढरपूर रोडवर ही दुर्देवी घटना घडली आहे. अक्षय नाळे, राहुल नाळे, अमित नाळे अशी या तरुणांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.

सातारा : शनिवारी पहाटे जीमला निघालेल्या युवकांच्या बाईकला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत तिघांचा मृत्यू झाला आहे. साताऱ्यातील फलटण-पंढरपूर रोडवर ही दुर्देवी घटना घडली आहे. अक्षय नाळे, राहुल नाळे, अमित नाळे या तरुणांचा अपघातात मृत्यू झाला आहे. तिघेही वडणी येथील रहिवाशी आहेत.
अक्षय, राहुल, अमित हे तिघे आज पहाटे बाईकवरुन पिंप्रद या गावात जीमसाठी निघाले होते. दरम्यान बाईकवर जात असताना मागच्या बाजूने येणाऱ्या एका अज्ञात ट्रकने यांच्या बाईकला जोरदार धडक दिली. या अपघातात तिघांचा ट्रकखाडी चिरडून मृत्यू झाला.
अपघातानंतर संतप्त गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र पोलिसांनी वेळीच घटनास्थळी दाखल होते संतप्त नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केलं. फलटण तालुका पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पोलीस अज्ञात वाहनाचा शोध घेत आहेत.
अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलीस सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत आहे. मात्र रस्त्यावरील खड्ड्यांमुळेच हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.























