(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Threatening Letter : एकनाथ शिंदे आणि कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी
Eknath Shinde : गडचिरोलीचे पालकमंत्री झाल्यापासून अशा अनेक धमक्या आल्या आहेत. पण या धमक्यांना मी कधी घाबरत नाही.
Eknath Shinde : राज्याच्या नगर विकास मंत्र्यांना नक्षलवाद्यांकडून धमकीचे पत्र आल्याची माहिती मिळत आहे. एकनाथ शिंदे हे ठाणे प्रमाणेच गडचिरोलीचे देखील पालकमंत्री आहेत. गेल्या काही महिन्यात त्यांनी गडचिरोली येथे विकास कामांचा धडाका लावला, त्याचप्रमाणे अनेक नक्षलवाद्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणले, त्यामुळे गडचिरोली आणि आसपासच्या जिल्ह्यातील नक्षलवादी नाराज असल्याचे सूत्रांनी सांगितले. याच नाराजीतून त्यांना एक पत्र देण्यात मिळाले आहे. या पत्रामध्ये, विकास कामे करू नका, अशी धमकी त्यांना देण्यात आली आहे. त्या संदर्भात मुंबईतील पोलिस तपास करत असून ठाण्यात देखील हे पत्र कोणी पाठवले या संदर्भात तपास सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. 'गडचिरोलीचे पालकमंत्री झाल्यापासून अशा अनेक धमक्या आल्या आहेत. पण या धमक्यांना मी कधी घाबरत नाही. उद्या मी स्वतः गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्याला मुख्य प्रवाहात आणण्याचा माझा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.'
आमच्या दलमच्या अनेक साथीदारांना तुम्ही आल्यापासून शहीद व्हावं लागलं. त्याचा बदला आम्ही लवकरच घेऊ, असे धमकीवजा पत्र सिपीआय (माओवादी) ह्या नावाने ठाण्यातील एकनाथ शिंदे ह्यांच्या घरी पोहचल्याची माहिती आहे.
शिंदे यांना गडचिरोलीत काम सुरू केल्यापासून आमचा पैसा बंद झाला असेही या पत्रात नमूद केले आहे याचा करारा जवाब दिल्या जाईल असं म्हणत शिंदें व त्यांच्या परिवाराला याची पूर्ण किंमत चुकवावी लागेल अशी धमकी पत्रात दिली आहे. आम्ही फक्त गडचिरोलीतच आहोत असं समजू नये, तर आमचे साथीदार सध्या अनेक शहरात असून तुमच्याही आसपास आहेत असे म्हणत समझनेवालों को इशारा काफी है लिहिले आहे. एकनाथ शिंदे हे भाषणात नक्षली संपवण्याचं जे बोलतात ते का होऊ शकत नाही हे सांगताना आपण देशातल्या अनेक राज्यांना माओवाद्यांनी व्यापले आहे असे ही हे पत्र सांगते.
सध्या गडचिरोलीत बराच चिरोध सुरू आहे तो म्हणजे सुरजागडच्या खाणकामाला. हा स्थानिक स्तरावर असला तरी इथे खदानीच्या कामाला विरोध हा नक्षलिंचा ही आहे. त्यांनी ही भूमिका नुसती वेळोवेळी फक्त मांडलीच नाहीये तर इथे आधी माओवाद्यांनी जाळपोळही केलेली असून लॉईड कंपनीच्या व्हाईस प्रेसिडेंटची इथे हत्या ही केली आहे. त्यामुळे इथे कामबंद होते पण आता परत कामाची हालचाल सुरू झाली आहे. या पत्रात शिंदे यांच्या सुरजागड दौऱ्याच्या बद्दल उल्लेख करत, त्याचे उत्तर आपण सोमाजीची हत्या करून दिले असल्याचे नमूद केले आहे. पण हा फक्त ट्रेलर असून, पिक्चर अभी बाकी है असे सूतोवाच ही केले आहे.
ही चेतावणी आपण दुसऱ्यांदा देत असल्याचे ही ह्यात म्हटले आहे. तसेच स्वतः कडे फक्त बंदुकाच नाही तरी इतर बरेच शस्त्र असल्याचाही दावा ह्यात केला आहे. आपण मोठा धमाका करणार असल्याचं सांगत, पत्रात एस पी गडचिरोली यांना ही शेवटी निशाण्यावर घेतले आहे.
सवाल केला आहे की किती दिवस तुम्ही बुलेटप्रुफ गाडीत फिरणार? आम्ही बघून घेऊ! करारा जवाब देणार असे म्हणत जोपर्यंत तुम्हाला खत्म करत नाही तोपर्यंत आश्वस्त श्वास घेणार नाही असा शेवट यात केलेला आहे.
सीपीआय माओवादी भामरागड एरिया कमिटी असं खाली लिहिलं आहे. खरंच नक्षली धमकी आहे का हा एक प्रश्न असला, तरी तक्रार ठाण्यात दाखल केल्याची माहिती आहे. ह्या पत्राचा सुरजागड आंदोलनाशी खरच किती संबंध आहे ह्याची पण चौकशी होते आहे.