(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आरोग्य विभागातील हजारो रिक्त जागा भरणार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
सध्या उपलब्ध असलेले कर्मचारी अथक परिश्रम करत आहे. मात्र त्यांच्या मदतीला नवीन टीम असणे गरजेचे आहे. यामुळे ही भरती तत्काळ करण्यात येणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.
मुंबई : कोरोना व्हायरसच्या संकटामुळे आरोग्य विभागातील उणिवा समोर आल्या आहेत. आरोग्य विभागात कमर्चाऱ्यांची कमतरता असल्याचीही बाब समोर आली असून विविध विभागात अनेक जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा तातडीने भरण्यासाठी राज्यभरातील आरोग्य विभागात मेगा भरती होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
आरोग्य विभागात 17 हजार 337 रिक्त पदे आणि वैद्यकीय शिक्षण विभागातील 11 हजार पदे आहेत. तसेच विविध महापालिकांमधील रिक्त पदे 100 टक्के भरण्यास मान्यता मिळाली आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली लॉकडाऊनच्या काळात ही पदे भरण्यासाठी विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. लॉकडाऊनमध्ये आरोग्य व्यवस्था बळकटीकरणावर विशेष भर दिला जात आहे, असं राजेश टोपे यांनी म्हटलं.
पुढील दीड महिन्यात या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी कोणतीही परिक्षा घेण्यात येणार नाही. नर्सिंग कॉऊन्सिल, एमबीबीएसची झालेली परीक्षा, पीजीचे मार्क हे विचारात घेतले जातील. त्यांचे गुण, अंतर्गत परीक्षा यावरून या जागा भरल्या जाणार आहेत. सध्या उपलब्ध असलेले कर्मचारी अथक परिश्रम करत आहे. मात्र त्यांच्या मदतीला नवीन टीम असणे गरजेचे आहे. यामुळे ही भरती तत्काळ करण्यात येणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.
विविध विभागात नव्या भरतीवर बंदी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी विविध विभागात नव्या भरतीवर राज्य सरकार बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण, औषधी द्रव्य विभाग वगळता इतर विभागांच्या नव्या भरतीवर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे इतर विभागांमध्ये पुढील सूचना मिळेपर्यंत कोणतीही भरती होणार नाही. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर विविध विभागांतील उपाययोजनांमध्ये सातत्य राखणे गरजेचं अहे. ही बाब लक्षात घेऊन चालू वित्तीय वर्षात कोणत्याही विभागातील अधिकारी/कर्मचारी यांची बदली करण्यात येऊ नये. असे आदेश सामान्य प्रशासन विभागामार्फत देण्यात आले होते.